रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत आयत्या वेळच्या आयात उमेदवारांना तिकीट नाही? मातोश्रीवर खलबते सुरू, राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणत्याही प्रकारे आयात उमेदवारांना आयत्या वेळी पक्ष प्रवेश केल्यानंतर नगराध्यक्ष पदाचे तिकीट मिळणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. रत्नागिरीतील थेट नगराध्यक्ष पदासाठी निष्ठावंत आणि प्रामाणिक महिला उमेदवारालाच तिकीट मिळेल असे बोलले जात आहे. याबाबत मुंबईतील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जोरदार खलबते सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अशी महाविकास आघाडी आहे. आगामी होऊ घातलेल्या नगर पालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढ्याच्या की कश्या याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विचारमंथन सुरू आहे. 

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत मागच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत मुळच्या शिवसेना पक्षाची सत्ता होती. त्यानंतर पक्ष फुटीनंतर अनेक नेते मंडळी आणि काही नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे यावर्षीच्या रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणत्याही प्रकारे आयत्या वेळी आयात होऊन आलेल्या उमेदवारांना तिकीट मिळणार नसल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार बोलले जात आहे. मागील वर्षानुवर्षे काम करणाऱ्या, सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकालाच नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले जाणार असल्याची माहिती देखील आता पुढे येत आहे. 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत मागील काही महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यात दौरे करत आहेत आणि पक्ष निहाय चाचपणी करत आहेत. त्यामुळे यासंदर्भात सुद्धा विनायक राऊत यांचा विचार घेतला जाऊ शकतो असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Comments