तळवलीत कपडे धुताना नदीत पडून महिलेचा मृत्यू

आबलोली : 
तालुक्यातील तळवली येथे कपडे धुताना नदीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज, मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मृत महिलेचे नाव रेखा गणपत कांबळे (वय ४७, रा. तळवली छोटी बौद्धवाडी) असे आहे. सकाळी साडेसातच्या दरम्यान त्या कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या होत्या. मात्र काही वेळाने त्या नदीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

नदीकिनारी स्मशानशेड असल्याने येथे गेलेल्या काही ग्रामस्थांना सकाळी मृतदेह दिसून आला. त्यांनी त्वरित येथील पोलिस पाटील यांना याबाबत माहिती दिली. पोलिस पाटील घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती गुहागर पोलिसांना कळवली.

पोलिस उपनिरीक्षक एस. के. भोपळे यांच्यासह पोलिस कर्मचारी व तळवलीचे बीट अंमलदार श्री. तडवी, श्री. नेमळेकर, सौ. शेट्ये आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.

Comments