दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त!

दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त!
by दिपक चुनारकर 
-September 28, 20250
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या परराज्यातून मद्याची तस्करी करून छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत तब्बल चौदा लाख सत्तेचाळीस हजार सहाशे एंशी रुपयांचा विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला आहे.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद येथील संदिप देवाजी दुर्गम या इसमाने आपल्या घरात विदेशी दारूची अवैध साठवणूक केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकताच आरोपी पोलिसांना पाहून पसार झाला. मात्र झडतीत ऑफिसर चॉईस कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या तब्बल 11,136 बाटल्या मिळून आल्या. या मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत तब्बल 14 लाखांहून अधिक असल्याचे समजते.

या प्रकरणी उपपोस्टे बामणी येथे संदिप देवाजी दुर्गम याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पुढील तपास पोउपनि. शाहु दंडे करीत आहेत.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात पोउपनि. विकास चव्हाण, पोहवा प्रमानंद नंदेश्वर, पोअं. निशिकांत अलोने व चापोअं. गणेश वाकडोपवार यांचा समावेश होता.

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची साठवणूक उघडकीस येणे म्हणजे कायद्याला सरळसरळ चॅलेंज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

Comments