नागेपल्लित शिक्षण व सेवा क्षेत्राची हरित मैत्री NSS युनिट आणि CRPF 9 बटालियनचा अभिनव उपक्रम

नागेपल्लित शिक्षण व सेवा क्षेत्राची हरित मैत्री 
NSS युनिट आणि CRPF 9 बटालियनचा अभिनव उपक्रम
By-दिपक चुनारकर
          राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय, आलापल्ली येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटतर्फे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ९ व्या बटालियनच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम आयोजित करण्यात आला.

      या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. पर्यावरण रक्षण, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रसेवेचा भाव विद्यार्थ्यांमध्ये जागृत होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला.

      कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून CRPF 9व्या बटालियनचे कमांडंट श्री शंभू कुमार उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, "झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नाहीत, तर ते जीवनदायिनी आहेत. आजच्या तरुण पिढीने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी अंगीकारली, तर उद्याचे भविष्य हरित व सुरक्षित राहील." तसेच त्यांनी NSS युनिटच्या पुढाकाराचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पर्यावरणप्रेमी नागरिक बनण्याचा संदेश दिला.

      या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. टी. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, "पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षण संस्थांनी केवळ ज्ञानपुरवठा न करता, मूल्यसंस्कार देण्याचेही कार्य केले पाहिजे. वृक्षारोपण हे त्याचेच एक मूर्त रूप आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "हे उपक्रम फक्त एका दिवसापुरते मर्यादित न राहता सातत्याने राबवावेत आणि त्या झाडांची देखभालही विद्यार्थ्यांनी करावी."

      कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी द्वितीय इन-कमांड योगेन्द्र आनंदशाय डाखोले, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक मिश्रा, उप कमांडंट बोक्का वेंकट रेड्डी व कारणम लक्ष्मी तुलसी, सहायक कमांडंट महेंद्र कुमार यादव, इन्स्पेक्टर दीपक देशमुख तसेच इतर अधिकारी व जवान उपस्थित होते.

      महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. एन. टी. खोब्रागडे, डॉ. आर. डब्ल्यू. सुर, प्रा. डी. टी. डोंगरे, प्रा. प्रतिमा सूर्यवंशी, प्रा. जव्हादे मॅडम, प्रा. दया मेश्राम, प्रा. प्रणय वनकर, प्रा. अमोल बोरकुटे, प्रा. करण मेश्राम, प्रा. ठेंगरे सर तसेच इतर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. NSS युनिटचे स्वयंसेवक विद्यार्थी आणि अधिकारी वर्गानेही वृक्षारोपणात उत्साहाने सहभाग घेतला.

      कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व सहभागी सदस्यांनी या उपक्रमाला सातत्याने पुढे नेण्याचा संकल्प केला. NSS युनिटतर्फे राबविलेला हा उपक्रम पर्यावरणीय जागृती घडवणारा, सामाजिक भान निर्माण करणारा आणि हरित भविष्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.

Comments