गुहागर तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात समृद्धी आंबेकर प्रथम( रत्नागिरी जिल्हा विज्ञान मेळाव्यात सादरीकरणाची संधी )
आबलोली
रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ व गुहागर तालुका विज्ञान मंडळातर्फे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान गुहागर तालुकास्तरीय मेळावा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात नुकताच संपन्न झाला. गुहागर तालुकास्तरीय मेळाव्यात "क्वांटम युगाची सुरुवात व संभाव्यता तसेच आव्हाने" या विषयाबाबत माहितीदृश्य सादरीकरण ( पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ) प्रणालीने ६ मिनिटांच्या वेळेत संगणकीय स्लाइडद्वारा चित्रे , माहिती तसेच प्रश्नोत्तरे पध्दतीने माध्यमिक गटातील विद्यार्थी वकृत्व सादरीकरण संपन्न झाले.सदरच्या विज्ञान मेळाव्यात पाटपन्हाळे विद्यालयाची इयत्ता दहावीमधील विद्यार्थीनी समृद्धी सुरेश आंबेकर हिने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल प्रशस्तीपत्र व शालेयपयोगी वस्तू प्रदान करून अभिनंदन करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान गुहागर तालुकास्तरीय मेळाव्यात गुहागर तालुक्यातील माध्यमिकस्तरीय दहा विद्यालयांनी सहभाग घेतला होता. " क्वांटम युगाची सुरुवात व संभाव्यता तसेच आव्हाने "या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजेच माहितीदृश्य सादरीकरणाने वकृत्व उपक्रम संपन्न झाला. सदरच्या उपक्रमात न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी सुरेश आंबेकर हिने प्रथम क्रमांक व दीक्षा दीपक भोसले - सरस्वती विद्यामंदिर जामसुत हिने द्वितीय क्रमांकाचे सुयश संपादन केले.सदरच्या सुयशस्वी विद्यार्थिनींना रत्नागिरी जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात माहितीदृश्य प्रणालीने सादरीकरणासाठी संधी लाभणार आहे. प्रथम क्रमांक संपादन केलेल्या समृद्धी सुरेश आंबेकर हिने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे क्वांटम म्हणजे काय ? , क्वांटमचा शोध व इतिहास , क्वांटमचा वापर , दैनंदिन जीवनातील क्वांटम , क्वांटमची संभाव्यता व भविष्यातील धोके आदी मुद्द्यांनुसार स्लाईड्सद्वारे फोटो व मुद्दयांनुसार माहितीचे इंग्रजी भाषेतून सादरीकरण केले. समृद्धी आंबेकर हिला विज्ञान शिक्षक के.डी.शिवणकर यांचे मार्गदर्शन लाभले.सदरच्या विज्ञान मेळाव्यात गुहागर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.दत्तात्रेय मेटकरी व पाटपन्हाळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.चिनार बेलवलकर यांनी परीक्षण केले. तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यातील सुयशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व शालेयपयोगी भेटवस्तू तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विद्यार्थी गौरव समारंभासाठी पाटपन्हाळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण , रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम , जिल्हा सदस्य भोजा घुटुकडे , गुहागर तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष जी.एल.पाटील , सचिव के.डी.शिवणकर , गुहागर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश अनंत शेंबेकर तसेच गुहागर विज्ञान मंडळाचे पदाधिकारी व विज्ञान शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी गौरव समारंभाचे व विज्ञान मेळाव्याचे सूत्रसंचालन पाटपन्हाळे विद्यालयाचे विज्ञान शिक्षक के.डी.शिवणकर व वैभव ढवळ यांनी आभार मानून शैक्षणिक उपक्रमाचा समारोप केला.
Comments
Post a Comment