धोकादायक असलेल्या जानवळे ग्रामपंचायत इमारतीची गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी केली पाहणी - इमारतीमध्ये कामकाज न करण्याच्या ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या सूचना

आबलोली 
गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत इमारत गेले अनेक दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जास्तच धोकादायक झाली असून या इमारतीची गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी पाहणी करून धोकादायक झालेल्या इमारतीचा अहवाल तात्काळ जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात येईल असे स्पष्ट केले. या इमारतीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती गुहागर कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. यावेळी सदरचे उपोषण स्थगित करावे अशी विनंती प्रशासनाकडून उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांना करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी तूर्तास उपोषण स्थगित केले होते, परंतु गेली अनेक दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे सदर इमारत जास्त धोकादायक बनली आहे. या इमारतीचे बांधकाम अधिकच धोकादायक बनले आहे.या इमारतीची तात्काळ गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी पाहणी केली. सदरच्या इमारतीमध्ये कामकाज करू नये अशा सूचना गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.
                                  यावेळी बोलताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की,जानवळे गावातील ग्रामपंचायतीच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली असून इमारत पूर्णपणे नादुरुस्त आहे. या इमारतीत बसणारे व काम करणारे कर्मचारी व पदाधिकारी जीव मुठीत घेऊन बसतात. गेली अनेक दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामपंचायत इमारत अधिकच धोकादायक बनली आहे. परंतु ग्रामपंचायत इमारतीसाठी अद्यापही निधी देण्यात आलेला नाही.एकीकडे ग्रामपंचायत कडून कुठलाही प्रस्ताव व मागणी नसताना जानवळे ओझरवाडी येथे तीस लाख रुपये खर्च करून साकव बांधण्यात आला, यासाठी जिल्हा नियोजन मधून ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. परंतु गावाच्या विकासासाठी असलेल्या ग्रामपंचायत इमारतीसाठी गेली अनेक वर्षे शासनाकडे निधीची मागणी करून देखील लागणारा निधी मिळत नसल्याची खंत आहे . शासन एकीकडे विनाकारण , विना मागणी कामासाठी लाखो रुपये निधी खर्च करत असून आणि जे गरजेचे आहे यासाठी निधी उपलब्ध केला जात नाही हे योग्य नाही.सदर इमारत कोसळून गंभीर अपघात झाल्यास याला जबाबदार शासन असेल का असाही सवाल जानवळे गावचे रहिवासी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी उपस्थित केला आहे.गेली अनेक वर्षे पंचायत समिती गुहागर व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे मागणी करूनही सदर नवीन इमारतीसाठी निधी देण्यात आला नाही. जानवळे ग्रामपंचायत इमारतीबाबत "मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना" अंतर्गत इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. परंतु त्यावरही अद्याप कार्यवाही झाली नाही.तरी या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तात्काळ निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी विनोद जानवळकर व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments