पडवे ग्रामस्थांची आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे विकास कामांबाबत आग्रही मागणी -एस.टी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आठ दिवसांत निर्णय
आबलोली
गुहागर तालुक्यातील पडवे येथील ग्रामस्थ आणि शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांनी आज आमदार भास्कर जाधव यांची चिपळूण कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. गावातील विविध विकासकामांबाबत समस्या मांडताना, गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली पडवे एस.टी स्टँडवरील बस सेवा त्वरित पूर्ववत सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.
तसेच गेल्या काही महिन्यांपासून पडवे एस.टी स्टँडवरील बससेवा बंद असून, येणारी-जाणारी वाहतूक तवसाळ-पडवे फाट्यावरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
या चर्चेत माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन गडदे, विनोद गडदे, समीर गडदे, पत्रकार सुजित सुर्वे यांच्यासह गावकऱ्यांनी प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप आणि ग्रामपंचायतीच्या अपारदर्शक कारभारावरही गंभीर आरोप केले.
ग्रामस्थांच्या मते, काही ग्रामपंचायत सदस्यांनी हेतूपुरस्सर खोटे प्रस्ताव तयार करून शासनाच्या निधीचा वापर फक्त आपल्या हितासाठी केला. तसंच गावात यावर प्रश्न विचारणाऱ्यांना धंद्यावर बहिष्कार, धार्मिक रंग देणे आणि दबाव टाकण्याचे प्रकारही घडत आहेत, असेही उघड करण्यात आले.
शासनाच्या योजनांचा गैरवापर कसा झाला आणि नातेवाईकांच्या फायद्यासाठी कशा पद्धतीने लाभ घेतले गेले, याचेही पुरावे आमदार भास्करशेठ जाधव यांच्यासमोर ठेवण्यात आले.
या सर्व मुद्द्यांवर आमदार भास्करशेठ जाधव यांनी गांभीर्याने चर्चा घेत, "ग्रामस्थांची गैरसोय थांबवण्यासाठी पुढील आठ दिवसांत एस.टी सेवा पूर्ववत सुरू केली जाईल आणि विकास कामांवर योग्य निर्णय घेतला जाईल," असे स्पष्ट आश्वासन दिले.
Comments
Post a Comment