बोर्ड सिक्युरिटी फोर्स मध्ये नियुक्ती झाल्याने संकेत शंकर गोताड याचा कोतळूक ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार
आजच्या तरूण वर्गाला आदर्श ठरेल अशी जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती अपयश पदरी आले तरी हार न मानता खडतर परिस्थितीतून मार्ग काढत गुहागर तालुक्यातील कोतळूक गावचा सुपूत्र संकेत शंकर गोताड याची BSF (border security force) मध्ये निवड होऊन तो राजस्थान जोधपूर येथे कार्यरत झाल्याबद्दल कोतळूक ग्रामपंचायत वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थांनी भारत माता की जय वंदेमातरम् अशा घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला
कोतळूक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या या सत्कार समारंभात संकेत गोताड याला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. संकेतने कोतळूक येथे चौथी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शचौथी शिक्षण घेतले. त्यानंतर आबलोली येथे हायस्कूल मध्ये १० वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यानंतर वेळणेश्वर येथील इंजिनिअर कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर शिक्षण घेत असतानाच सैन्य दलात भरती होण्यासाठी सांगली येथे अकॅडमीत प्रवेश केला. जिद्द, चिकाटी आत्मविश्वासाने त्याने प्रयत्न सुरू केले ३ वर्षापूर्वी त्याला सैन्य दलात भरती होण्यासाठी संधी निर्माण झाली परंतु दुर्दैवाने त्याला अपयश आले. अपयश आले तरी खचून न जाता मेहनत, जिद्द न सोडता् संकेतने आपले अथक प्रयत्न सुरू ठेवले व त्याला यश येऊन त्याची BSF (border security force) मध्ये निवड होऊन राजस्थान जोधपूर येथे तो रूजू झाला आहे.
सैन्य दलात भरती झाल्यानंतर तो पहिल्यांदाच कोतळूक गावात आल्याने त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्याचे आई, बाबा, सरपंच सौ प्रगती मोहिते, उपसरपंच शितल गोरिवले, सदस्य सचिन ओक, सचिन भेकरे, सुनिल आगिवले, लक्ष्मण वरकर, समीक्षा वाघे, आसावरी बाधावटे, मनाली मोहित, ग्रामपंचायत अधिकारी कमलाकर शिरकर, कोतळूक सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, पोलिस पाटील संचिता मोहिते, विनोद शिगवण, शमिका भेकरे, कोतळूक शाळा नं १ मुख्याध्यापक प्रताप देसले,वसंत गोरिवले, समीर ओक, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश आरेकर, अनिकेत आरेकर, कोतळूक शाळा नं. १ सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment