कोकण विकासाची ऐतिहासिक चिंतन परिषद यशस्वीपणे पार पडली!
मुंबई | नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काल (९ जुलै २०२५) कोकण विकास चिंतन परिषद उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. कोकणातील विविध क्षेत्रातील २०० हून अधिक तज्ज्ञ, कार्यकर्ते आणि उद्योजक या महत्त्वपूर्ण परिषदेच्या साक्षीदार ठरले.
सलग सात तास चाललेल्या या परिषदेतील चर्चांमध्ये शेती, पर्यटन, मत्स्य प्रक्रिया, फलोद्यान, पाणी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा अशा कोकणच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला.
परिषदेची शान वाढवणारे मान्यवर नेते उद्योगमंत्री उदय सामंत, फलोद्यानमंत्री भरतशेठ गोगावले, खासदार धैर्यशील दादा पाटील, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार चंद्रकांत मोकल, तसेच विविध विषयांतील तज्ज्ञ अधिकारी आणि मान्यवर यांनी उपस्थित राहून परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अधिवेशन काळातच आयोजित केलेली ही परिषद म्हणजे कोकणच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी दरवर्षी एकत्र येऊन चिंतन करण्याचा नवा आदर्श ठरला आहे. यासाठी ‘स्वायत्त कोकण समिती’ स्थापन करण्याचा निर्णय या परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या समितीमार्फत कोकणातील तज्ज्ञांनी लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना मदत करून प्रश्नांचे प्रभावी निराकरण साधावे, हा या मागचा उद्देश आहे. या परिषदेमध्ये शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्यांवर चर्चा करुन कोकणवासियांना त्याची माहिती देण्यात आली. सदर प्रकल्प संदर्भातील माहिती उपस्थित लोकप्रतिनिधी व मंत्री मान्यवरांनी दिली.
चर्चेतून कोकणच्या २५ प्रमुख प्रश्नांची यादी तयार झाली आहे — ज्यामध्ये माकडांचे उत्पात, पर्यटनातील अनियमित बांधकामे नियमित करणे, तसेच पर्यटन, फलोद्यान आणि मत्स्य उद्योगासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात दरवर्षी प्रत्येकी १००० कोटींची तरतूद, असे अनेक मुद्दे समाविष्ट आहेत. हे प्रश्न आता कोकणातील प्रत्येक आमदाराला देण्यात येत आहेत. यातून प्रत्येक लोकप्रतिनिधींनी किमान एका प्रश्नाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या कार्याचा पुढील पाठपुरावा ग्लोबल कोकण आणि समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स करणार आहेत.
या परिषदेचे यश अधिक ठळक करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष शुभेच्छा देत पुढील कार्यवाहीसाठी समृद्ध मराठी चेंबरच्या शिष्टमंडळाशी भेट घेण्याचे आश्वासन दिले आहे.
याच वेळी शिवस्वराज्य मराठी फेरीवाला संघटना या आपल्या संघटनेतर्फे मुंबईतील मराठी फेरीवाल्यांच्या समस्याही मंत्री आणि मान्यवर लोकप्रतिनिधींकडे मांडण्यात आल्या. मराठी फेरीवाल्यांना महानगरपालिकेकडून होणारा अन्याय दूर व्हावा, यासाठीही शिष्टमंडळाने ठोस चर्चा केली.
एकूणच, कोकणच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी या परिषदेने महत्त्वपूर्ण दिशा दाखवली आहे. यासाठी सहभागी झालेल्या सर्व तज्ज्ञ, उद्योजक, मान्यवर नेते व प्रतिनिधी यांचे मनःपूर्वक आभार!
आम्हाला खात्री आहे की या उपक्रमातून कोकणच्या विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल आणि मराठी फेरीवाल्यांच्या हक्कांसाठीही नवा अध्याय लिहिला जाईल.
---
संजय यादवराव
मुख्य संयोजक
ग्लोबल कोकण | समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स
Comments
Post a Comment