बारा वरिष्ठ माओवाद्यांनी केले मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण. दोन महिलांनी सोपवल्या बंदुका
12 वरिष्ठ माओवाद्यांनी केले मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण
दोन महिलांनी सोपवल्या बंदुका
By दिपक चुनारकर -June 7, 2025
गडचिरोली : मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यापुढे 12 वरिष्ठ कॅडरच्या माओवाद्यांनी नक्षल चळवळीचा त्याग करण्याचा निर्णय घेत आत्मसमर्पण केले. त्यात दोन वरिष्ठ महिला माओवाद्यांनी नक्षली गणवेशात येऊन त्यांच्या अत्याधुनिक एके-47 रायफली मुख्यमंत्र्यांकडे सोपविल्या. मुख्यमंत्र्यांनी त्या सर्वांना संविधानाचे पुस्तक भेट देऊन इथून पुढे माओवादाचा मार्ग सोडून संविधानाने दाखविलेल्या मार्गाने चालण्याचा संदेश दिला.
पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, माजी मंत्री आ.धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.मिलिंद नरोटे, अपर मुख्य सचिव (वने)तथा पालक सचिव मिलींद म्हैसकर, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश , अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्यसाई कार्तिक हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वप्ना ऊर्फ पापक्का बुचय्या चौधरी (डिव्हीसीएम, इंद्रावती एरीया) रा.वेलगूर, ता.अहेरी, रामदास ऊर्फ झिटकुराम ऊर्फ चिन्नाजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी मटकुवरसिंग हलामी (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी रा.कवडीकसा, ता.धानोरा, जि.गडचिरोली, शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पदा (डिव्हीसीएम, कुतुल दलम, रा.गुर्रेकसा, ता.धानोरा, पुष्पा ऊर्फ शामबत्ती नांगसाय होळी (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी, रा.गुर्रेकसा ता.धानोरा, कोसा कुम्मा गोटा (कमांडर, कुतुल दलम), रा.कस्तुरमेट्टा, जि.नारायणपूर (छ.ग.), दुर्गी ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी, (उपकमांडर, अहेरी दलम) रा.होडरी, ता.भामरागड, अजय ऊर्फ भीमा सोमडू मुचाकी (उपकमांडर, राही दलम) रा. भुसापूर, जि.बिजापूर (छ.ग.), संगिता ऊर्फ मसरी दोगे आत्राम (एसीएम, सप्लाय टिम), रा.रामय्यापेठा, ता.अहेरी, सविता ऊर्फ सुनिता भिमा नरोटे (एसीएम, भामरागड दलम), रा.पिपली बुर्गी, ता.एटापल्ली, अंजु ऊर्फ छाया दसरु वड्डे (एसीएम, पश्चिम सब झोनल टेलर टिम) रा.झुरी, ता.एटापल्ली, अरुणा ऊर्फ सोमारी ऊर्फ प्रिती येर्रा तलांडी (एसीएम, डॉक्टर टिम) रा.जिंजगाव, ता.भामरागड आणि दिलीप ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा (सदस्य, कंपनी क्र.10) रा.मुरंगल, ता.भामरागड यांचा समावेश आहे.
या 12 लोकांवर मिळून 1 कोटी 12 लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळ जिल्ह्यात आणखी खिळखिळी झाली आहे.
Comments
Post a Comment