शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा पंढरपूर येथे स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
आम.शेखरजी निकम आणि प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील सन २००१ ते २०२४ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.या मेळाव्यासाठी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालया मार्फत स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्रि ॲग्री अल्युम्नी असोसिएशन च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ातील माजी विद्यार्थ्यांना संघटीत करणे,आजी व माजी विद्यार्थ्यांसोबत ऋणानुबंध कायम ठेवणे व विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणे हा प्रमुख उद्देश ठेवुन पंढरपुर मध्ये प्रथमच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यासाठी पंढरपूर व नजीकच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.आम.शेखरजी निकम यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत विविध आठवणींना उजाळा दिला.महाविद्यालयाच्या स्थापनेपासुन आजतागायत झालेल्या शैक्षणिक प्रवासाचा त्यांनी आढावा घेतला.विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती व्यवसाय करावा, एआय तंत्रज्ञान व इतर संबंधित बाबींचा वापर करुन शेती पुरक व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप द्यावे असे प्रतिपादन केले.प्राचार्य डाॅ.सुनितकुमार पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित केले.सुमारे २५ वर्षाच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार होता आले तसेच त्यांच्या सुख दुखात सहभागी होता आले व त्यांचे उज्ज्वल यश ही बघता आले ही भाग्याची गोष्ट आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार आम. शेखरजी निकम व डाॅ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते करण्यात आले.या सोहळ्यात सहभागी झालेले विद्यार्थी महाविद्यालयातील आठवणींनी भारावून गेले.पंढरपूर तथा विठुरायाच्या पावन नगरीत हा स्नेहमेळावा अगदी पालखीच्या पूर्वार्धात होण्याचा योगायोग नक्कीच पावित्र्यपूर्णता दर्शवत आहे.कोणताच आणि कुठलाच संबंध नसताना महाविद्यालयाच्या माध्यमातून आपणा सर्वांना आयुष्यभरासाठी एकत्रित बांधणारा धागा आदरणीय शेखर सर आणि ज्यांनी हा धागा हृदयापासून जपला व वेळोवेळी अधिक घट्ट केला असे आपले प्राचार्य आदरणीय पाटील सर यांच्याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त केले व महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे मार्गदर्शनानुसार डाॅ.हरिश्चंद्र भागडे,प्रा.प्रसाद साळुंके, श्री.विपुल घाग,प्रा.प्रणय ढेरे व प्रा.रविंद्र सरगर यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा