रत्नागिरीतून जाणाऱ्या मिऱ्या नागपूर महामार्गाच्या कामात नियमांची पायमल्ली, राहुल गांधी यांच्याकडे करणार पत्रव्यवहार: जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन यांची प्रतिक्रिया

रत्नागिरी मधून जाणाऱ्या मिऱ्या नागपूर महामार्गाच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाने निर्धारित केलेल्या नियमांची पायमल्ली करून महामार्गाचे काम रेटवण्याचे सुरू आहे. मिऱ्या नागपूर हायवेच्या रत्नागिरी मध्ये सुरू असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये आमच्याकडे अधिक माहिती प्राप्त झाली असून सविस्तर रित्या पत्रव्यवहार काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी व्यक्त केली आहे. 

रत्नागिरी मध्ये मिऱ्या नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तसेच काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना जे सूचना बोर्ड लावणे आवश्यक होते ते कुठे दिसत नाही. जिकडे तिकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीमध्ये प्रवास करणाऱ्या दुचाकी चार चाकी तीन चाकी वाहन चालकांना धुळीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत आहे. महामार्गाच्या आजूबाजूला पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना देखील खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. एस टी बस मधून मधून प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. ज्या ठिकाणी रस्ता खोदला आहे त्या ठिकाणी प्रचंड खड्डे असल्याने वाहन चालकांना या खड्ड्यांशी सामना करावा लागत आहे. 

या कामाच्या संदर्भामध्ये महामार्ग प्राधिकरण चे कोल्हापूर येथे असणारे ऑफिस आणि त्या ठिकाणचे असलेले अधिकारी यांचे काही लक्ष आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. मिऱ्या गाव ते साळवी स्टॉप यादरम्यान चौपदरीकरणाचे आणि कॉंक्रिटीकरणाचे काम किती टक्के पूर्ण झाले आहे?, साळवी स्टॉप ते हातखंबा या दरम्यान किती टक्के काम पूर्ण झाले आहे? आणि त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे का? आजूबाजूला जे व्यापारी छोटे दुकानदार आहेत त्यांना काय काय समस्या निर्माण होत आहेत याबाबत कुठल्या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली आहे का. महामार्गाचे काम सुरू असताना देखील महामार्गावरून रत्नागिरीतून अवजड वाहनांची वाहतूक होते. सगळीकडे धुळीचे साम्राज्य त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीच्या संदर्भामध्ये काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी व्यक्त केली आहे. 


Comments