“माझा पुढचा शो एलफिन्स्टन ब्रिजवर”, कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार


प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थट्टा करणारं एक गाणं सादर केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ देखील त्याने समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. या गाण्यामुळे दोन दिवसांपासून बराच वाद चालू आहे. कुणाल कामरा याने ज्या ठिकाणी ते गाणं म्हटलं आणि शो केला त्या हॉटेलची, तिथल्या ‘दी हॅबिटॅट’ या स्टुडिओची शिवसेना (शिंदे) कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणाल कामराचं वर्तन योग्य नाही असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर कुणाल कामरा याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘माय स्टेटमेंट’ असं कॅप्शन देत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कुणाल कामराने म्हटलं आहे की “ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता, ती अशा प्रकारच्या शोचीच जागा आहे. हॅबिटॅट हे ठिकाण आणि तो स्टुडिओ, तिथे जे काही घडलं त्यासाठी जबाबदार नाही. या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. त्या ठिकाणी अपशब्दही वापरले गेले. लॉरी भरुन टॉमेटो आणले गेले असं मी ऐकलं कारण आम्ही जे बटर चिकन तुम्हाला वाढलं ते तुम्हाला आवडलं नाही.”

माफी मागण्यास कुणाल कामराचा नकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले होते की कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांची माफी मागायला हवी. त्यावर कुणाल म्हणाला, मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही.


कुणालने त्याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी नवी जागा निवडली आहे

कुणालने ज्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम घेतला होता ती जागा एकनाथ शिंदे समर्थकांनी उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे आता कुणालने त्याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी नवी जागा निवडली आहे. तो म्हणाला, “माझ्या पुढच्या कार्यक्रमाचं ठिकाण असं असेल जे पाडण्याची अधिक गरज आहे. मी एल्फिन्स्टन ब्रिज (प्रभादेवी) किंवा मुंबईतील अशा इमारतीची निवड करेन जी पाडण्याची गरज आहे.” कुणालने त्याच्या गंमतीदार शैलीत (उपहासाने) असं म्हटलं आहे.

Comments