मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच,खेरशेत या संस्थेच्या वतीने "देवानं प्रिय असोक " या नाट्य कलाकृतीचा सन्मान

आबलोली:
         चक्रवर्ती सम्राट अशोकाचा युद्धापासून बुद्धाकडे घेऊन जाणारा अविस्मरणीय दोन अंकी नाट्य प्रयोग बोधीवृक्ष फाउंडेशन निर्मिती आणि सिद्ध आर्ट प्रणित "देवानंप्रिय असोक "नुकताच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे संपन्न झाला. याप्रसंगी समस्त भारतीयांना अभिमान वाटावा असा जम्बुदीपाचा गौरवशाली इतिहास इथल्या अपरान्त भूमीत नाट्यकला कृतीतून सादर केलेल्या सर्व कलावंतांचा मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच , खेरशेत,ता.चिपळूण ,जि. रत्नागिरी या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने मंचाचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या समवेत आद. मनोज जाधव सर, प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांच्या शुभहस्ते तर सामाजिक कार्यकर्ते आद. सुरेश जाधव , शिवश्री कृष्णाजी कोकमकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 
           बोधीवृक्ष फाउंडेशन निर्मित सिद्ध आर्ट प्रणित "देवानं प्रिय असोक "यांचा सकल भारतीयांना अभिमान वाटावा असा जम्बुदीपाचा गौरवशाली इतिहास या महा नाट्यकला कृतीच्या रूपानं चिपळूण नगरीत सादर करण्यात आला. ही महा नाटयकला कृती म्हणजे प्रत्येक भारतीयांनी आवर्जून पहावे अशी सम्राट अशोकाची गौरवगाथा, त्यांच्या संमग्र जीवनातील धगधगता इतिहास ' अक्षरशः अपरान्तच्या नाट्य रसिकांना मनस्वी भावला आहे. पसंतीत उतरला आहे. नाट्यातील विविध प्रसंग पहाता मन गहिवरून येते.मनात विचारांचे काहूर निर्माण होते. क्षणा क्षणाला हृदयाची धडधड आणि कळत नकळत डोळ्यातून ओंघळणारे अश्रू यातील प्रत्येक प्रसंगांना दाद देत होते.' यातील कलिंग युद्धानंतर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या सम्यक विचारांशी समरस होऊन आपल्या दोन्ही मुलांना धम्माच्या प्रचाराकरिता परदेशात पाठवून धम्मक्रांती घडवून आणतो .शिलालेख ,स्थापत्य कला, विद्यापीठांची नवनिर्मिती करून अखंड जम्बुदीपामध्ये एक नवीन परिवर्तन घडवून आणतो. कुशाग्र बुद्धीचा, कर्तव्यदक्ष महापराक्रमी सम्राटाच्या जीवनावर बेतलेला या नाट्यप्रयोगाने चार चांद लावले आहे. खरंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाला समजावून घेण्याकरिता ही अजरामर नाट्य कलाकृती निश्चितच पाहण्याजोगती आहे.
                  रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावचे सुपुत्र प्रतिभावंत लेखक आद. उदय गणपत जाधव यांच्या सिद्ध हस्ते लेखणीतून साकारलेली ही नाट्य कृती आणि राजापूरची सुकन्या सहनिर्माती पुनम मांजलकर यांच्या कल्पक संकल्पनेतून निर्माण झालेले ' देवानप्रिय असोक ' ही महा नाट्यकला कृती म्हणजे इतिहासातील एक अनमोल ठेवा म्हणावा लागेल. या महा नाट्यकला कृतीतील सर्वच कलावंतांनी आपल्या उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अगदी प्राण ओतून आपल्या भूमिकेशी प्रत्येक कलावंत समरस झाल्याचे चित्र स्पष्ट होते. इतकेच नव्हे तर , संगीत, पार्श्वगायन , नृत्य दिग्दर्शन , प्रकाश योजना, रंगभूषा आणि दिमाखदार नेपथ्य या अविष्काराने अपरान्त वासियांना मंत्रमुग्ध केले. प्रामुख्याने यातील बहुतांशी कलावंत कोकणातील असल्यामुळे या महा नाट्यकला कृतीला त्यांनी योग्य तो न्याय दिला आहे . विशेषत: सम्राट अशोकाची भूमिका साकारणारे राजापूर तालुक्यातील मिठगवाणे गावचे सुपुत्र प्रितेश मांजलकर हा कलावंत उपस्थित नाट्य रसिकांचा मनात घर करून राहिला . या नाट्यप्रयोगाच्या समाप्तीनंतर मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच ,खेरशेत ता.चिपळूण ,जि . रत्नागिरी या कौटुंबिक संस्थेच्या वतीने मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या समवेत डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी- भारत ( रजि) या राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक , अध्यक्ष मनोज जाधव सर आणि समता सैनिक दल, चिपळूणचे भीम मार्शल प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांच्या शुभहस्ते आणि बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना, चिपळूण या युनियनचे उपाध्यक्ष सुरेश जाधव , सत्यशोधक संघटनेचे शिवश्री कृष्णाजी कोकमकर ,कु. संघराज कदम, कु. संघमित्रा कदम ,सौ. राजमुद्रा कदम यांच्या उपस्थितीत नाटकातील सर्व कलावंतांचा सन्मान करण्यात आला. शाल , पुष्प करंडक स्वरूपात सहनिर्मिती पुनम मांजलकर आणि सम्राट अशोकाची दमदार भूमिका निभवणारे जेष्ठ कलाकार प्रितेश मांजलकर यांनी हा सन्मान स्वीकारला.
          सम्राट अशोकाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा ते चिपळूण येथील महेंद्रगिरी (परशुराम क्षेत्र) या अपरान्त भूमीत ' देवानापिय असोक हि महा नाट्यकला कृतीच्या माध्यमाद्वारे आम्ही कृतार्थ झालो. उद्याच्या पिढीला सम्राट अशोक कळवा याकरिता मोठा प्रचार आणि प्रसार म्हणजे "देवान पिय असोक " ही एकमेव नाट्यकला कृती निश्चितच प्रेरणादायी ठरेल यामध्ये संदेह नाही असे प्रतिपादन मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेतचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी केले. या अपरान्त भूमीत या महानाट्याचे प्रयोग पुन्हा व्हावेत अशी समस्त चिपळूणकरांनी विनंती करून या बोधीवृक्ष फाउंडेशन आणि सिद्ध ‌आर्ट प्रणित या नाट्यसंस्थेला आणि सर्व कलावंतांना मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचाच्या परिवाराच्यावतीने आणि उपस्थित चिपळूणच्या सर्व हौशी रसिक प्रेक्षकांच्या तसेच बौद्ध धम्म बंधू भगिनींच्या वतीने भरभरून शुभेच्छा दिल्या गेल्या. 
         याप्रसंगी पुनश्च चिपळूणकरांच्या आग्रहास्तव ' देवानंपिय असोक ' या महानाट्याचा प्रयोग एप्रिल महिन्यामध्ये चिपळूण येथे आयोजित करण्याचा मानस बोधीवृक्ष फाउंडेशन च्या वतीने सन्मा. प्रितेश मांजलकर याने व्यक्त केला आहे.

Comments