राजन साळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू: भाजपा कार्यकर्ते विनायक कदम यांची प्रतिक्रिया
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून हे सत्य असल्यास राजन साळवी यांनी भाजपमध्ये तात्काळ प्रवेश करावा आम्ही त्यांचे भाजपमध्ये नक्कीच स्वागत करू अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे राजापूरचे भाजपा कार्यकर्ते विनायक कदम यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे राजापूर विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षाची विकासाची कामे झाली नाही किंबहुना काही लोकांनी होऊ दिली नाहीत. अंतर्गत राजकारणापाई राजन साळवी यांना मंत्रीपद सुद्धा मिळाले नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून विधानसभा मतदारसंघात चांगली आणि भरीव अशी विकासाची कामे येऊ शकली नाही. तर आता तसे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे भाजपचे नेते आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने विकासासाठी निधी मिळू शकतो. गावागावातील रस्ते आणि पूलांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, आरोग्याचे, पाणीटंचाईचे प्रश्न आदी प्रश्न सोडवण्यासाठी एका विचारांचे नेतृत्व असणे गरजेचे आहे.
राजापूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे राजन साळवी भाजपमध्ये येण्याचा विचार करत असतील तर त्यांनी निश्चितच भाजपमध्ये येण्याचा विचार करावा आणि तात्काळ प्रवेश करावा आम्ही त्यांचे नक्की स्वागत करू. यामुळे भारतीय जनता पक्ष जास्त जोमाने वाढू शकतो त्याचप्रमाणे विकासाचा बॅकलॉग सुद्धा भरू शकतो. अशी प्रतिक्रिया भाजपचे कार्यकर्ते विनायक कदम यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment