केंद्रशाळा शीर येथे गटशिक्षणाधिकारी श्री.आर. एच. गळवे यांची भेट

आबलोली (संदेश कदम) 
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा शीर नं. १ येथे शिवजयंतीचे औचित्य साधून पंचायत समिती गुहागरचे गटशिक्षणाधिकारी आर. एच. गळवे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी शाळेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी महोदयांचे शिवरायांच्या जीवनावरील पुस्तक भेट देऊन स्वागत केले. यावेळी शीर केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र रेडेकर, शीर नं. ३ या शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार पवार व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री.आर.एच.गळवे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर मौलिक मार्गदर्शन केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवरायांनी जसे स्वराज्य निर्माण केले त्याप्रमाणे शिवरायांचा आदर्श घेऊन आपण आपले जीवन यशस्वी करावे असे आवाहन केले. शाळेतील विद्यार्थी आयुष गुरव हा इस्रो नासा परीक्षेमध्ये अंतिम फेरीत जिल्हास्तरावर पात्र ठरल्याबद्दल तसेच सारथी पुणे संस्थेतर्फे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत दोन्ही गटात तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी तनिष्का आंबेकर व दिवेश ठोंबरे यांचे अभिनंदन केले. शाळेचा परिसर पाहून समाधान व्यक्त केले. शाळेचे माजी विद्यार्थी, सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून शाळेने केलेला विविध शैक्षणिक उठाव पाहून सर्वांना धन्यवाद दिले. तसेच शाळेच्या प्रगतीसाठी सर्व शिक्षकांनी चांगली मेहनत घ्यावी असे आवाहन केले. शाळेतील उपशिक्षक अजय खेराडे यांनी साहेबांच्या भेटीबद्दल व मौलिक मार्गदर्शनाबद्दल शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले.

Comments