विमानतळाजवळ सर्वात मोठी बाजार समिती उभारणार, पणनमंत्री रावल यांची माहिती नवी मुंबई
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट आहे
पुढील काळात जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करणार असून, यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराजवळ प्रशस्त जागा शोधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी नवी मुंबईत दिली.
वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन त्यांनी व्यापारी, संचालक मंडळाशी चर्चा करून मार्केटची पाहणी केली. पणन विभागाचा आढावा घेऊन भविष्यातील उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. बाजार समितीतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास वेगाने केला जाईल. सर्वांना विश्वासात घेऊन धोरणे आखली जातील, असे रावल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
बाजार समितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे, कामगार नेते नरेंद्र पाटील व संचालक मंडळाने पणनमंत्र्यांचे स्वागत केले. बाजार समितीचे नवीन प्रकल्प व शासनाकडून काय सहकार्य हवे याचीही माहिती दिली. संस्थेची माहिती घेतल्यानंतर रावल यांनी प्रत्यक्षात मार्केटची पाहणी केली.
आवश्यक सुधारणा :
1. मुंबई बाजार समितीमधील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार. महाराष्ट्रातील कृषिमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
2. व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत त्याकडे रावल यांचे लक्ष वेधले.
बाजार समिती सभापती अशोक डक, सचिव पी. एल. खंडागळे, बाजार समिती संचालक संजय पिंगळे, आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment