जयंत पाटील “मुख्यमंत्री व्हायचं असेल तर खूप उठा-बशा..”
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता संघर्षासाठी तयार झाला आहे. आमचा पक्ष फुटला तेव्हा आम्हाला हिणवलं जात होतं की कुणी राहिलं नाही तुम्हाला प्रचाराला तरी माणसं मिळतील का? अशी अवहेलना केली जात होती. मात्र शरद पवार या नावाचं वलयच असं आहे की अनेक गोष्टी पुढे घडत गेल्या. असा जिल्हा आणि तालुका नाही जिथे शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री जयंत पाटील अशा घोषणा देऊ नका त्यासाठी खूप उठा-बशा काढव्या लागतात असंही वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
पक्ष फुटला तेव्हा..
आमच्या पक्षाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लढण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. एक मतदारसंघ तर असा आहे जिथे ३० जणांनी सांगितलं आहे आम्हाला उमेदवारी द्या. महाराष्ट्रातलं सरकार बदलण्याची महाराष्ट्राची मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा बोजवारा उडाला आहे. कृषी क्षेत्रात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेला आहे. आठ लाख कोटींचं कर्ज झालं आहे. महायुतीचे लोक सत्तेतून जातील तेव्हा महाराष्ट्रावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज ठेवून जातील. कायदा आणि सुव्यवस्था याची अवस्था तर वाईट आहे. आमदारच गोळीबार करत आहेत, गुंडांची गरजच उरली नाही. पोलिसांची मानसिकता या सरकारने बिघडवली. माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे असं सारखं पोलिसांना धमकावलं जातं आहे असाही आरोप जयंत पाटीलयांनी केला. एक फुल आणि दोन हाफ करतात काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
तुतारी वाजवणारा माणूस
शिवस्वराज्य यात्रेची ही शेवटची सभा आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे ते सगळ्या घरांत जाऊन सांगा. आपल्या सगळ्यांना चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार रायगडावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हे चिन्ह ठेवलं. छत्रपती शिवरायांच्या विचारांवरचा महाराष्ट्र घडवा अशी शपथ आम्ही सगळ्यांनी घेतली होती. महाराष्ट्रात असा मतदारसंघ मिळणार नाही मला प्रचाराची सभा न घेता मला महाराष्ट्राने सातवेळा निवडून दिला आहे. माझ्याविरोधात कुणी शिव्या दिल्या की कार्यभाग साधला जातो, असंही जयंत पाटील म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा