*अवयव प्रत्यारोपण आता अगदी कमी खर्चात! खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांना ससूनचा स्वस्त पर्याय!*


* फ्रेश न्यूज रत्नागिरी*

*अवयव प्रत्यारोपण आता अगदी कमी खर्चात! खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांना ससूनचा स्वस्त पर्याय!*

पुणे :--- ससून सर्वोपचार रुग्णालयात मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अगदी कमी खर्चात होत आहेत. खासगी रुग्णालयात यासाठी १० लाख रुपयांहून अधिक खर्च होत असताना, ससूनमध्ये सुमारे ३ लाखांमध्ये ही शस्त्रक्रिया होत आहे.

   त्यातही रुग्णांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्याने हा खर्च आणखी कमी होत आहे. ससूनमध्ये नुकतीच एक मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.*

हडपसरमधील एका ५२ वर्षीय व्यक्तीला मूत्रपिंडविकार होता. तो या विकाराने २०१५ पासून त्रस्त होता. त्याची मूत्रपिंडे निकामी झाल्याने प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. हा रुग्ण एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम करतो. त्याच्या पत्नीनेच त्याला मूत्रपिंड देण्याची तयारी दाखविली. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने ससून रुग्णालयात प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला.

मूत्रपिंडविकारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्ण आणि त्याच्या पत्नीच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर ससूनचे समाजसेवा अधीक्षक सत्यवान सुरवसे यांनी अवयवदानाचा प्रस्ताव तयार करून तो विभागीय मानवी अवयव प्रत्यारोपण समितीसमोर सादर केला. समितीने परवानगी दिल्यानंतर अखेर ९ ऑक्टोबरला ससून रुग्णालयात ही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. संदीप मोरखंडीकर, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर आणि डॉ. दानिश कामेरकर यांच्या पथकाने केली.

*सरकारी योजनांचा लाभ*

ससूनमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यंत कमी खर्चात होते. ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत करण्यात येतात. त्यामुळे रुग्णांना औषधे, इंजेक्शन, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सर्जिकल साहित्य व शस्त्रक्रियेनंतरच्या लागणाऱ्या तपासण्या यासाठी कमी खर्च लागतो. हा खर्चही अनेक सामाजिक संस्था करतात. याचबरोबर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील एक वर्षाची औषधे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मिळतात.

ससूनमध्ये अतिशय कमी खर्चात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. सरकारी योजनांमुळे रुग्णांचा प्रत्यारोपणाचा खर्च कमी होत आहे.

   गरजू रुग्णांनी मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी ससून रुग्णालयाशी संपर्क साधावा.

*– डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय*

📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी

फॉलो

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments