महाराष्ट्र शासन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत झाडे लावण्याची मोहीम कधी सुरू करणार?, उन्हाच्या कडाक्यामुळे दुचाकी स्वार, तीन चाकी स्वार, पादचारी हैराण, रत्नागिरीत महामार्गावर आहे अशी परिस्थिती

सध्या ऑक्टोबर हिट सुरू झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चांगल्याच उन्हाच्या झळा लागत असल्याने दुचाकीस्वार, तीन चाकी आणि पादचारी यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा किंवा आवश्यक तिथे नियमानुसार झाडे लावण्याचे कष्ट प्रशासन कधी घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोकणात पाऊस कमी झाला आहे. ऑक्टोबर हीट सुरू झाली आहे. उन्हामुळे एवढी काहीली होत आहे की महामार्गावरून दुचाकी किंवा तीन चाकी वाहन घेऊन जाणे त्रासदायक ठरत आहे. चार चाकी वाहनांना वातानुकूलित सेवा असते. मात्र दुचाकी वाहनांना गाडी चालवताना उन्हाचे चटके बसतात. पूर्वीच्या जुन्या रस्त्याच्या दुतर्फा चांगली मोठमोठी झाडे होती. त्यामुळे प्रवाशी झाडाखाली काही वेळ थांबून विसावा घेत असत. महामार्ग चौपदरिकरणामुळे मोठी झाडे तोडण्यात आली. शासन नियमानुसार आवश्यक तिथे झाडे लावायची आहेत. मात्र प्रत्यक्षात शासनाच्या वतीने महामार्गाच्यालगत झाडे लावलेली दिसून येत नाहीयेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. एकीकडे धुळीचे साम्राज्य तर दुसरीकडे उन्हाच्या झळा. आयत्यावेळी कुठे पाणी लागले तर घोटभर पाणी सुद्धा मिळताना मुश्किल. अशी परिस्थिती सध्या महामार्गाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने यासंदर्भात तात्काळ निर्णय घेऊन महामार्गालगत झाडे लावण्याची मोहीम सुरू करावी अशी मागणी जनतेमधून करण्यात येत आहे. 

Comments