शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते - दहिवली येथे" मयुरपंख - २०२४ " जल्लोष मोठ्या उत्साहात संपन्न..!

आबलोली (संदेश कदम) 
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते-दहिवली येथे आंतरमहाविद्यालयीन युवा सांस्कृतिक महोत्सव "मयुरपंख - २०२४" नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली अंतर्गत असणाऱ्या सुमारे ३१ कृषि व संलग्न महाविद्यालयांनी या युवा महोत्सवामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन कोकण कृषि विद्यापीठ,दापोली चे कुलगुरु डाॅ.संजयजी भावे व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम यांचे हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
                    यामध्ये शास्त्रिय गायन,वाद्य वादन,समुह गायन,नृत्य, प्रश्नमंजुषा,वादविवाद, एकांकिका,वक्तृत्व, मुकनाटय,एकपात्री नाट्य, कोलाज,चित्रकला,पोस्टर्स निर्मिती,रांगोळी व संचलन आदीं.चा समावेश होता.तसेच शास्त्रीय संगीत स्पर्धेत शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय विजेता तर कृषि महाविद्यालय,दापोली उपविजेता ठरले.भारतीय सुगम संगीत गायन मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे यांनी विजेतेपद तर कृषि महाविद्यालय,दापोली यांनी उपविजेतेपद पटकावले.ताल वादन मध्ये कृषि महाविद्यालय,मुळदे यांनी उपविजेतेपद तर कृषि महाविद्यालय,दापोली यांनी विजेतेपद मिळवले.स्वरवाद्य वादन मध्ये कृषि महाविद्यालय,खरवते यांनी उपविजेतेपद तर कृषि महाविद्यालय,दापोली यांनी विजेतेपद पटकावले.समुह गायनामध्ये अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,खरवते उपविजेते तर कृषि महाविद्यालय,दापोली विजेते ठरले.शास्त्रीय नृत्यामध्ये कृषि महाविद्यालय,मांडकी यांनी विजेतेपद पटकावले. लोकनृत्यामध्ये कृषि महाविद्यालय,दापोली यांनी विजेतेपद तर कृषि महाविद्यालय,खरवते व कृषि महाविद्यालय,मांडकी विभागून उपविजेते ठरले.मिमिक्री स्पर्धेमध्ये वनशास्र महाविद्यालय, दापोली हे विजेते तर कृषि महाविद्यालय,दापोली हे उपविजेते ठरले.
                      तसेच एक पात्री अभिनयामध्ये कृषि महाविद्यालय,खरवते यांना उपविजेतेपद व उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे यांना विजेतेपद मिळाले.एकांकिका स्पर्धेमध्ये कृषि महाविद्यालय, खरवते यांनी विजेतेपद व उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे यांनी उपविजेतेपद पटकावले. चित्रकला,कोलाज,पोस्टर्स निर्मिती मध्ये कृषि महाविद्यालय, किर्लोस,उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे यांनी विजेतेपद तर अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय खरवते,कृषि महाविद्यालय मांडकी व कृषि माॅडेलिंग,कार्टुनिंग,रांगोळी,स्पॉट फोटोग्राफी व संचलन आदी.मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे,कृषि महाविद्यालय सांगुळवाडी,कृषि महाविद्यालय तोंडवली व उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे हे विजेते तर कृषि महाविद्यालय,खरवते,कृषि महाविद्यालय,दापोली,कृषि महाविद्यालय,सांगुळवाडी व कृषि महाविद्यालय,खरवते हे उपविजेते ठरले.या सर्व स्पर्धामध्ये सुमारे पाचशे विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. या सर्व स्पर्धांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कुलगुरु डाॅ.संजयजी भावे यांचे कडुन शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांना गौरव चिन्ह प्रदान करण्यात आले.मयुरपंख २०२४ महोत्सव यशस्वी करण्यासाठी शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून विशेष मेहनत घेण्यात आली.

Comments