रत्नागिरी भूषण....छत्रपती पुरस्कार विजेती कु. पूर्वा किनरे

रत्नागिरी भूषण....छत्रपती पुरस्कार विजेती कु. पूर्वा किनरे

कुमारी पूर्वा किनरे हिला तिच्या योगासन या क्रिडाप्रकारातील सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल नुकताच २०२२-२३ या वर्षासाठीचा महाराष्ट्र राज्याचा  शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. विशेष म्हणजे या वर्षापासून योगासन चा समावेश शिवछत्रपती पुरस्कार साठी करण्यात आला आणि पहिलाच पुरस्कार रत्नागिरीतील सुकन्या कु.पूर्वा किनरे हिला जाहीर झाला. आज पूर्वा ला भेटून तिचे अभिनंदन केले. 

पूर्वा च्या निमित्ताने मला आठवतो तिचा सगळा प्रवास. २०१२ मध्ये पूर्वा रत्नागिरीतून चिपळूणला 
कोव्यास संस्थेमध्ये दर रविवारी योगासन सरावासाठी जात असे.त्या काळात कोव्यास संस्थेचे नाव योगासन मध्ये खूप होते. माझी मुलगी अवंती हिला सुद्धा मी तिची लवचिकता पाहून तिसरीपासून योगासन साठी चिपळूण ला घेऊन जायचे ठरवले होते. त्याच काळात आमचे नशीब पालटले. महाराष्ट्र राज्यात जिल्हा योग अधिकारी अशी एकमेव पोस्ट निर्माण केली गेली आणि ती सुद्धा रत्नागिरी मध्ये. ते होते सुमारे ३६ राष्ट्रीय योगासन स्पर्धा खेळलेले श्री. रवीभूषण कुमठेकर सर. ते आले आणि योगासन चे रत्नागिरीचे नशीब बदलून गेले. त्यांनी आल्याआल्या शिर्के हायस्कूल,जिजीपिएस शाळा मध्ये रोज योगासन सराव  घ्यायला सुरू केला. त्यांचे सगळे ज्ञान मुलांना द्यायला सुरुवात केली आणि मग सुरू झाला रत्नागिरी तील मुले आणि मुली यांचा योगासन मध्ये जिल्हा,विभाग,राज्य आणि राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय प्रवास! 
पूर्वा किनरे,प्राप्ती किनरे,सानिका केळकर,अवंती काळे,सृष्टी जाधव,गौरी शिंदे दसुरकर,श्रुती फणसे,योगिता बनप, राधिका दुर्गवळी,प्रीतीश दीक्षित,दुर्वांकुर चाळके असे अनेक .. या सगळ्यांनी अनेक  राष्ट्रीय योगासन स्पर्धा गाजवल्या. 
पूर्वा त्यातील एक!  मनापासून खुप मेहनत घेणारी. प्रचंड लवचिक आणि   योगासन या विषयाचा ध्यास घेतलेली. त्याकाळात पूर्वाचा दरारा आणि दर्जा दोन्ही होता. जिल्हा,विभाग,राज्य ते राष्ट्रीय स्पर्धा पूर्वा आहे म्हटल्यावर पहिला नंबर ठरलेला असायचा. आजपर्यंत पूर्वा ने गेल्या १२ वर्षात शालेय योगासन स्पर्धा ते युनिव्हर्सिटी लेव्हल स्पर्धा खेळताना आतापर्यंत २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा पॅरिस फ्रान्स येथे तीन रौप्य पदके त्याशिवाय सुमारे
२५ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वैयक्तिक, ह्रिदमिक, आर्टीस्टिक योगा प्रकारात पहिल्या तीन मध्ये क्रमांक मिळवला आहे. तिच्या तोडीस तोड क्षमता तिची सख्खी बहीण प्राप्ती किनरे हीची सुद्धा आहे. तिनेही पॅरिस येथे दोन रौप्य शिवाय अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. यांच्या यशात मोलाचा वाटा तिचे गुरू श्री. रवीभूषण कुमठेकर यांचा आहे. एक आदर्श गुरू कसा असावा?  तर कुमठेकर सरांसारखा असे मी स्वतः अनुभवल्या मुळे अभिमानाने म्हणेन. त्या शिवाय पूर्वा चे आई बाबा यांचे मोठे योगदान आहे. देशभरात जिथे स्पर्धा असेल तिथे पूर्वा चे मनोधैर्य वाढवण्यासाठी आई बाबांनी यायचे. असा त्यांनी पणच केला असावा. अनेक अडचणीवर मात करून आपल्या मुलींना यशाच्या शिखरावर पोचवण्यासाठी त्यांनी तन,मन,धनाने घेतलेले अथक परिश्रम यांची तुलनाच होऊ शकत नाही. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही इतके परिश्रम तिचे वडील श्री.शिवराम किनरे आणि आई सौ.पूजा किनरे यांचे आहेत. पूर्वाला शिवछत्रपती हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने  पूर्वा ,तिचे कुटुंबीय,कुमठेकर सर यांच्या बरोबरच रत्नागिरी साठी अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वा चे वैशिष्ठ्य म्हणजे ती अभ्यासात देखील हुशार! योगा च्या सरावात  खूप वेळ गेल्यानंतर सुद्धा तिचे दहावी,बारावी चे मार्क सुद्धा नव्वद टक्क्यांवर. आता ती इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर उत्तम प्रकारे पास झाली. सध्या नागपूर युनिव्हर्सिटी मधून तिचे शिक्षण आणि योगा स्पर्धा सुरू आहेत.
पुर्वाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! आम्हाला तुझा अभिमान वाटतो... आगे बढो!

अविनाश काळे, गोळप 
९४२२३७२२१२

टिप्पण्या

news.mangocity.org