करजुवे खाडी किनारी सुरू आहे अवैध वाळू उत्खनन? रस्त्याच्या कडेला जंगल परिसरात दिसून येत आहेत मोठ मोठे वाळूचे ढिगारे!

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडी किनारी मोठ्या प्रमाणावर बाळू उत्खनन होत असून सदर वाळू उत्खननाला नेमके अभय कुणाचे आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान सदर वाळू उत्खनन हे अधिकृत परवानगी घेऊन सुरू आहे की अवैध पद्धतीने सुरू आहे याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे भागात जे सी बी च्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू असल्याचे बोलले जात आहे. मोठ मोठ्या ट्रक मधून वाळूची वाहतूक केली जात असल्याचे देखील बोलले जात आहे. अवजड गाड्यांची वाहतूक होत असल्यामुळे संगमेश्वर डिंगणी करजुवे धामापूर या दरम्यानचा रस्त्याची देखील दयनीय झाली असल्याचे या भागातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 
जिल्ह्यात पाऊस कमी कमी होत आला आहे. त्यामुळे अवैध वाळू उत्खनन मायनिंग करणाऱ्यांना संधी चालून आली आहे. करजुवे भागात रस्त्याच्या कडेला जंगल परिसरात वाळूचे मोठमोठे ढिगारे दिसून येत आहेत. एकीकडे शासनाने वाळू धोरण आखले जात असताना दुसरीकडे अशा प्रकारे वाळू विक्री अत्यंत महाग दरात केली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधितांनी यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. 
शासनाने ऑनलाईन वाळू ऑर्डर करण्यासाठी पोर्टल सुद्धा सुरू केले आहे. सामान्य दरात वाळू खरेदी करण्याचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले असताना देखील अशा प्रकारची वाळू उत्खनन करण्यासाठी नेमकी कुणाची परवानगी असावी असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Comments