कशेळीतील पूर्वा किनरेला शिवछत्रपती पुरस्कार
रत्नागिरीची आंतरराष्ट्रीय योगापटू पूर्वा किनरे हिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू म्हणून दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रत्नागिरीची आंतरराष्ट्रीय योगापटू पूर्वा शिवराम किनरे हिला जाहीर झाला आहे. यंदा प्रथमच या पुरस्कारासाठी योगा खेळाचा समावेश झाला होता आणि पहिला पुरस्कार रत्नागिरीच्या पूर्वा हिने मिळवला आहे.
हे पुरस्कार २०२२-२३ या वर्षाचे आहेत. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. पुरस्काराची यादी नुकतीच जाहीर झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाली जवळच्या कशेळी या गावात राहणाऱ्या पूर्वा ने योगासन प्रकारात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. रत्नागिरी येथील क्रीडा कार्यालयात असलेल्या राज्यातील पहिल्या योग क्रीडा केंद्रामध्ये राज्य योग क्रीडा मार्गदर्शक रविभूषण कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तेरा वर्षांपासून ती प्रशिक्षण घेत आहे. अविरत मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी योगासनामध्ये यशाची मोठी उंची गाठली. नुकतेच पनवेल येथील महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे तिने उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. अभ्यासाबरोबरच योगासनातील आपली साधना तिने कायम ठेवली. तिची बहीण प्राप्ती ही राष्ट्रीय योगापटू आहे. २०१३ मध्ये पॅरिस (फ्रांस) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने 3 रौप्य पदके पटकवली आहेत. शासनाच्या आणि असोसिएशनच्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 30 सुवर्णपदकासह अनेक पदके पटकावली आहेत.
तिचे वडील शिवराम किनरे हे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत. ते खो-खोचे राष्ट्रीय पंच म्हणूनही काम पाहत होते. तिची आई गृहिणी असून तिने योगा प्रशिक्षणामध्ये दोन्ही मुलींचे चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे. पूर्वा केंद्रे हिने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवत रत्नागिरी जिल्ह्याची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मान्यवरांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आपल्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याचे ऐकल्यानंतर खूप आनंद वाटला, गेल्या अनेक वर्षांची मेहनत फळाला आली .यासाठी प्रशिक्षक, मार्गदर्शक, शिक्षक आणि आई-वडिल यांचे मोलाचे योगदान असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार मिळाल्यानंतर पूर्वा हिने व्यक्त केली.
योगपटू पूर्वा हिच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे हे मोठे यश संपादन करता आले. पदके जिंकून तिने महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ तिला मिळाले. माझी योगा प्रशिक्षक म्हणून रत्नागिरीत नियुक्ती झाल्यानंतर सुरु केलेल्या प्रशिक्षण अकॅडमीतील ती पहिली खेळाडू आहे, तिचे प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment