*शिक्षक-दीन पुन्हा एकदा

*शिक्षक-दीन पुन्हा एकदा !*

*भारतीय शिक्षकांनी निर्माण केलेली गप्प बसा संस्कृतीच  भारतीयांच्या अवैज्ञानिक मागास मानसिकतेचं एकमेव कारण आहे !*
*- गौरव लता मोहन भराटे*
            वर्गात त्रिकोण-चौकोन शिकवणारे गुरुजी मुलांना *वैज्ञानिक दृष्टिकोन* शिकविण्यात अपयशी ठरले.*
(काही उपक्रमशील व विवेकी शिक्षकांचा अपवाद वगळता)*
जिज्ञासेने प्रश्न करणाऱ्या विद्यार्थ्यास गप्प करणारे,
विद्यार्थ्यांत अभ्यासाव्यतिरिक्त असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन न देता त्याचा हिरमोड करणारे,
शिक्षक असूनही स्वतः कोणताच वैज्ञानिक दृष्टिकोन न बाळगता आशिक्षिता सारखे वागणारे,
उदा:- वर्गात नवग्रहांची अंगठी घालून येणारे,
गळ्यात-हातात अनेक बाबा-बुवांचे गंडे-दोरे बांधून येणारे,
राष्ट्रगीत व झेंडावंदन करतांना आपापल्या धर्माची टांग मध्ये आणून त्यास विरोध करणारे,
भूगोलाच्या तासिकेत ग्रहणात विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर पडू नये हे सांगणारे,
स्वतःच अनेक अंधश्रद्धांमध्ये गुरफटून राहणारे,
विज्ञानात सजीवांची लक्षणे शिकवणारे गुरुजी दगडापुढे माथा टेकवतांना विद्यार्थ्यांना दिसणारे,
विज्ञानाच्या तासाला वर्गात चमत्कारांचे वर्णन सांगणारे,
शाळेची सहल देवदर्शनाला घेऊन जाणारे,
वर्गात भूता-खेतांच्या गोष्टी सांगणारे,
भारतीय घटनेने स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्षता ह्या तत्वाला  पायदळी तुडवत शिकवतांना स्वतःच्याच जाती-धर्माचा अजेंडा मिरवणारे व त्यावरून विद्यार्थ्यांत भेदभाव करणारे,
वर्गातच एखाद्या अस्तित्वात नसलेल्या कथित देवाची मूर्ती स्थापून त्यासमोर आरत्या-स्तोत्र म्हणणारे,
मुलांना वैज्ञानिक गोष्टी न शिकवता अमुक तमूक धर्मांच्या प्रार्थना व भाकडकथा शिकवणारे,
मंदिर,दर्गा रस्त्याला लागून असल्यास गाडीचा हॉर्न वाजवणारे,
नवरात्रात उपवास म्हणून चप्पल न घालता शाळेत येणारे,
शाळेतील कार्यालयात देवी-देवतांचे फोटो लावणारे,
चिकित्सा व विवेकी बुद्धिप्रामाण्यवादाशी फारकत घेऊन व्यक्तिप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्यावर भर देणारे शिक्षक लोक विद्यार्थी न घडवता केवळ परीक्षार्थीच घडवतील,
इत्यादी इत्यादी करणारे महान गुरुजी विद्यार्थ्यांना काय झ्याक वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतील ?

*म्हणून विद्यार्थ्यांनी कोणताही विचार न करता त्यांचा मेंदूच आपल्याकडे गहाण ठेवावा हीच गुरुदक्षिणा मागणारे गुरुजीच आपल्याकडे निर्माण झाले.*
ज्यामुळे विद्यार्थ्यांची गप्पबसा संस्कृती टिकून राहीली व त्यांना प्रश्नच पडणार नाहीत अशी शैक्षणिक व्यवस्था रूढ होऊन त्याची परिणती भारतीयांच्या बौद्धिक दिवाळखोरीत झाली.

*प्रश्नांचे मोहोळ जागवण्यातच ज्ञानाचा उगम असतो हे समजून घेणारे बुद्धीप्रामाण्यवादी विवेकी गुरुजीच भारताला तारतील अन्यथा केवळ परीक्षार्थी घडवणाऱ्या गुरू-शिष्य परंपरेमुळे उद्भवलेला शिक्षणाचा बट्ट्याबोळ वर्षानुवर्षे पुढे असाच सुरू राहील.*
शिक्षकांनी माझ्यासारख्या विद्यार्थ्याचं एवढं तरी ऐकून आचरणात आणावं हीच त्यांनी त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा समजावी.
*पण जे शिक्षक ह्यातून सुटले त्यांना भलामोठा सलाम !*
बघा बरं तुमच्याच हातात आहे उद्याचा विवेकी भारत !
(ह्यात कुण्याच गुर्जीच्या धार्मिक भावना वगैरे दुखविण्याचा प्रश्नच येत नाही, कारण गुर्जी लोक समजदार आणि संवैधानिक वर्तन करणारे असतात असा माझा तरी समज आहे, म्हणून आपापले धर्म घराच्या आतच ठेवून शाळेत केवळ एक "माणूस" बनून शिकवा, म्हणजे माणसेच घडवू शकाल.)
*आणि शिक्षकदिनाचे खरे हकदार असलेल्या जोतीराव फुल्यांच्या जन्मदिनी किंवा स्मृतिदिनीच शिक्षकदिन साजरा व्हावा ह्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, कारण त्या दाम्पत्याने त्यांचं समस्त जीवन शिक्षणातून सामाजिक जागृतीकरिता अर्पण केलं होतं त्यांचा यथोचित सन्मान होऊ द्या !*
✒〰〰〰〰〰〰〰〰〰

*- गौरव लता मोहन भराटे*
*(शोध अविरत सत्याचा)*

Comments