शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पाचल विभागाचे विभाग प्रमुख गणेश तावडे यांचा आपल्या पदाचा राजीनामा
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पाचल विभागाचे विभाग प्रमुख गणेश तावडे यांचा आपल्या पदाचा राजीनामा*
*विद्यमान आमदार यांच्या मनमानी कारभारामुळे राजीनामा दिला असल्याची गणेश तावडे यांची माहिती*
*गणेश तावडे गेली सात वर्षे पाचल विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसला आहे. राजापूर तालुक्यातील पाचल विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख गणेश तावडे यांनी विद्यमान आमदार यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती गणेश तावडे यांनी पत्रकारांना दिली.
गणेश तावडे हे गेली अनेक वर्षे शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते म्हणून पाचल विभागांमध्ये ओळखले जातात. मागील दहा पंधरा वर्षे ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये पाचल विभागात जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी गणेश तावडे यांनी अथक परिश्रम घेतले होते. मागील सात वर्षांपासून विभाग प्रमुख म्हणून आपली कामगिरी बजावत असताना या काळामध्ये झालेल्या लोकसभा विधानसभा या निवडणुकांमध्ये पाचल विभागामधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता विद्यमान आमदार परस्पर वेगवेगळ्या पदांच्या नियुक्त्या करत आहेत. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पक्षाचे काम रेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्षानुवर्षे शिवसेना पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील वरिष्ठ नेत्यांकडून आम्हाला डावलले जात आहे. पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता परस्पर वेगवेगळ्या पदांच्या नियुक्त्या दिल्या जात आहेत. आणि हीच गोष्ट आम्हाला खटकत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर जिल्हाप्रमुख त्यानंतर तालुकाप्रमुख यांच्या नियमानुसार आणि पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार आतापर्यंत पदांच्या नियुक्त्या करण्यात येत होत्या. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. पक्षात अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे.
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात आमदार राजन साळवी सलग पंधरा वर्षे म्हणजेच तीन टर्म निवडून येत आहेत. मात्र या काळात रस्ते आणि पाखाड्या यांच्या व्यतिरिक्त भरीव अशी विकासाची कामे त्यांच्या हातून झाली नाहीत. राजापूर तालुक्यात चांगल्या शैक्षणिक सुविधा, चांगल्या आरोग्याच्या सुविधा निर्माण होणे गरजेचे होते. त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना रत्नागिरी किंवा मुंबई पुणे सारख्या शहरांत उपचारासाठी जावे लागत आहे. तसेच तालुक्यात कोणताही एखादा चांगला उद्योग नाही. एम आय डी सी प्रकल्प नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारीची भीषण समस्या आहे. त्यामुळे विरोधक यासंदर्भात आम्हाला प्रश्न विचारतात त्यावेळी आम्ही त्यांना उत्तरे देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आमदार म्हणून विशेषत्वाने तालुक्याच्या या मूलभूत समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र पंधरा वर्षात काहीही झाले नाही.
या वेगवेगळ्या कारणामुळेच राजापूर विधानसभा मतदारसंघातील पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन मी स्वतः विभाग प्रमुख म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती गणेश तावडे यांनी पत्रकारांना दिली.
गणेश तावडे यांच्या राजीनाम्यामुळे संपूर्ण राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राजापूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
Comments
Post a Comment