.आई-वडील शेतकरी, लेकाची पहिल्याच प्रयत्नात भरारी; मेहनत-जिद्दीने पोलीस उपनिरीक्षकपदी निवड....
कोकणातल्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील प्रतिक राणे या तरुणाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षेत उज्वल यश मिळवलं आहे. मेहनत आणि जिद्द ठेवल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवता येतं, याचाच आदर्श त्याने घालून दिला आहे. प्रतिकच्या या यशानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील बोरथडे गावातील त्याचे मित्र आणि ग्रामस्थांनीही प्रतीकचं कौतुक करत गावातून त्याची गुलाल उधळत, थाटात वाजत-गाजत मिरवणूक काढत त्याचं स्वागत, अभिनंदन केलं आहे.
जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नाला मेहनतीची जोड दिल्यास यश दूर नाही. मेहनतीने यशालाही सहज गवसणी घालता येते याचाच आदर्श या ग्रामीण भागातील असलेल्या प्रतिक राणे या तरुणाने घालून दिला आहे. प्रतिक राणेचं प्राथमिक शिक्षण लांजा तालुक्यातील बोरथडे जिल्हा परिषद शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण वाटूळ येथे झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण लांजातील श्रीराम वंजारे महाविद्यालयात झालं आहे. प्रतिक हा सामान्य कुटुंबातील असून आई-वडील गावातच शेती करतात. प्रतिकने मिळवलेलं हे मोठं यश आई-वडिलांसाठीही अभिमानास्पद ठरलं आहे.

Comments
Post a Comment