कोकण रेल्वेनं प्रवास, 800 कोटींचे हिरे.. ‘नवरा माझा नवसाचा 2’चा धमाकेदार ट्रेलर




नवरा माझा नवसाचा 2’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात दमदार कलाकारांची फौज पहायला मिळत असून येत्या 20 सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात एक जोडपं होतं. आता दुसऱ्या भागात दोन जोडपी आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना डबल धमाका आणि डबल मनोरंजन या चित्रपटात अनुभवता येणार आहे. मनोरंजनासोबतच या चित्रपटात एक लव्हस्टोरी पण आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये कथेची झलक पहायला मिळते. पहिल्या भागातील काही कलाकार या दुसऱ्या भागातही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

‘नवरा माझा नवसाचा 2’मध्ये स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची जावई, मुलगी अशा भूमिकेत दिसणार आहे. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा आता जावयाला फेडता येतो का? याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नवस फेडण्यासाठीच्या रेल्वे प्रवासात हिरे चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाचं कथानकही उलगडणार आहे. त्यामुळे मनोरंजक आणि थरारक अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. उत्तम गोष्ट, दमदार अभिनय, खुसखुशीत संवाद, श्रवणीय संगीत अशी मनोरंजनाची पुरेपूर मेजवानी या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. त्याचसोबत काही सरप्राइज गोष्टींचाही या चित्रपटात समावेश आहे





Comments