लाडक्या गौराईंना 16 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य का दिला जातो? 16 आकड्यामागील कारण काय?
गणेशाच्या (Ganesh Chaturthi) आगमनानंतर चौथ्या दिवशी गौरींच आगमन होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गौराईला महानैवेद्य अर्पण केला जातो. गौरी-गणपती हा सण कुळाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. ज्या प्रकारे एखादी सासरी गेलेली कन्या माहेरी आल्यावर तिचा लाड केला जातो. तसंच ज्येष्ठा गौरी माहेरी आल्यावर त्यांच्यासाठी सोळा (Gauri Pujan) प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. ज्येष्ठा गौरींचं आगमन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिच्यासाठी पंचपक्वानांची तयारी केली जाते. पूर्वीच्या काळी नैवेद्यात 16 भाज्या, 16 प्रकारच्या कोशिंबीरी, 16 प्रकारच्या चटण्या केल्या जात होत्या.
सध्या काही घरांमध्ये 16 भाज्या मिळून एकत्रित भाजी केली जाते. यामध्ये पालक-मेथी, चुका, आळू, अंबाडी, पत्ताकोबी, फुलकोबी, लाल भोपळा, गिलके, दोडका, गवार, वालाच्या शेंगा, कारले, भेंडी, पडवळ, शेवग्याच्या शेंगा, सिमला मिरची, दुधी भोपळा, चाकी, चवळी.. यापैकी 16 भाज्या केल्या जातात.
गौरी आवाहनाच्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. गवार- भोपळ्याची भाजी अथवा पालेभाजी करण्यात येते. ज्येष्ठा गौरी आवाहन, ज्येष्ठ गौरी पूजन आणि आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन. हा सण माहेरवाशीणींचा असल्यामुळे तिच्या आवडीचे पदार्थ करण्यात येतात.
16 हा आकडा कुठून आला?
आधीच्या काळी 16 हे वय मासिक पाळी येण्याचं, कन्येची स्त्री होण्याचं वय मानलं जातं. मात्र आधुनिक काळात मासिक पाळीचं वय कमी होत चाललं आहे. त्याशिवाय 16 मातृदेवता असल्याने हा आकडा मानला गेल्याचं सांगितलं जाते. ज्येष्ठा गौरी या आपल्या परंपरेनुसार आणल्या जातात. काही ठिकाणी मुखवट्याच्या, तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवतात. ज्येष्ठा गौरी हा सण माहेरवाशींणींचा सण असून त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस असतो.

Comments
Post a Comment