जगबुडी नदीपात्रात मृतावस्थेत आढळली महाकाय मगर

 

खेड : शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात एक नऊ फूट लांबीची महाकाय मगर मृतावस्थेत तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जगबुडी नदीपात्र प्रदूषित झाले असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

या मगरीचे वय साधारणतः आठ वर्ष असावे, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मृत मगर नदीत तरंगत असल्याची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरीला नदीच्या काठावर आणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करून नदीच्या किनारीच या मृत मगरीला जाळण्यात आले. दरम्यान खेडमधील जगबुडी नदीमध्ये मगरीच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असून गेल्या काही वर्षातली ही पाचवी घटना आहे.

भरतीच्या पाण्यामध्ये खेड शहरातील मच्छीमार्केट परिसरात नदीकिनाऱ्यालगत ही महाकाय मगर नदीच्या पाण्यात तरंगत असताना निदर्शनास आली. काही नागरिकांनी हे पाहिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत दूरध्वनीहून कल्पना दिली, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या मगरीला जेसीबी मशीनच्या साहाय्याने काठावर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जंगले यांना बोलावण्यात आले. त्याच ठिकाणी शवविच्छेदन करून पंचनामा करून नदीच्या काठावरच मगरीला जाळण्यात आले.

Comments