मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

या कार्यक्रमांतर्गत दिनांक 09 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून दिनांक 08 डिसेंबर, 2022 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे.

प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी- 09 नोव्हेंबर 2022 (बुधवार) रोजी. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 09 नोव्हेंबर 2022(बुधवार) ते 08 डिसेंबर 2022 (गुरुवार). दावे व हरकती निकालात काढणे- 26 डिसेंबर 2022 (सोमवार) पर्यंत. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे 5 जानेवारी 2023 (गुरुवार)

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 अंतर्गत महिला, दिव्यांग घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीय पंथीय व्यक्ती आणि देह विक्री करणा-या महिला या गटातील मतदारांचे नोंदणीसाठी विशेष शिबीराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

महिला, दिव्यांग यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरे 12 नोव्हेंबर, 2022 (शनिवार) व 13 नोव्हेंबर, 2022 (रविवार). तृतीय पंथीय व्यक्तीं, देहविक्री करणा-या महिला आणि घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तीयांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरे. 26 नोव्हेंबर, 2022 (शनिवार) व 27 नोव्हेंबर, 2022 (रविवार).

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गावातील नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासणी व नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी तसेच मतदार यादीतील नोंदीला आधार क्रमांक जोडण्याचा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावा याकरिता सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन 10 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे.

मतदार यादीची प्रारुप प्रसिध्दी 09 नोव्हेंबर 2022 रोजी झाल्यानंतर नागरिकांनी मतदार यादीतील आपल्या नोंदीवी तपासणी करावी. सदर नोंदीची तपासणी/पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळावरही करता येईल. यामध्ये ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, अशा नवीन मतदारांसाठी नमुना 6, मतदार यादीतील नावाची वगळणीकरिता नमुना 7 व मतदार यादीतील नावामध्ये दुरुस्ती/स्थतांतरित/दिव्यांग मतदान ओळखपत्र मिळणेकरिता नमुना 8 हे घरबसल्या ऑनलाईन NVSP पा संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App (VHA) या मोबाईल अॅपवर अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे तसेच ऑफलाईन पध्दतीने अर्ज संबंधित तहसीलदार (AERO) यांचे कार्यालयात देता येतील.

सन 2023 पासून दरवर्षी 01 जानेवारी, 01 एप्रिल, 01 जुलै व 01 ऑक्टोबर अशा चार अर्हता दिनांकानुसार वा त्यापूर्वी 18 वर्ष पूर्ण होणा-या नागरिकांना मतदार यादीमध्ये आगाऊ नाव नोंदणी करता येणार आहे.

10 नोव्हेंबर 2022 विशेष ग्रामसभेच्यावेळी मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी, तपासण्यासाठी व यादीचे ग्रामसभेत वाचन करण्यात येणार आहे. तसेच आधार जोडणीचा उपक्रमही त्याचवेळी राबविण्यात येणार आहे. तरी या उपक्रमामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. ज्यांचेकडे मतदान ओळखपत्र आहे अशाही मतदारांनी मतदान केंद्रावर जावून त्यांची नावे मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करावी.

तरी जिल्हयातील सर्व नागरिकांनी मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नाव नोंदणीचा उपक्रम, वर नमूद केलेल्या विशिष्ट गटातील मतदारांसाठी विशेष शिबीरांचा उपक्रम तसेच विशेष ग्रामसभा उपक्रम यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments