भोस्ते घाटात मासळीच्या कंटेनरला अपघात

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ओली मासळी वाहून नेणारा कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने या जीवघेण्या अपघातात चालकाचा जीव वाचला. चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून या अवघड वळणावर एकामागोमाग एक असे अपघात होत असल्याची चर्चा आहे.
तीव्र उताराचा भोस्ते घाट उतरणाऱ्या वाहनचालकांना येथील अवघड वळणाचा अंदाज येत नसल्याने इथे वाहनावरील ताबा सुटतो आणि वाहन संरक्षक भिंतीला धडक देतात. त्यामुळे वाहन पलटी होते. गेल्या महिनाभरात एकाच ठिकाणी सुमारे सहा ते सात अपघात झाले आहेत.
या अपघातांमध्ये सुदेवाने मनुष्यहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झालेली आहे. चार दिवसांपूर्वी याच वळणावर जयगड येथून मुंबईकडे एलपीजी गॅस घेऊन निघालेला टैंकर पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधून एलपीजी गॅसला गळती लागल्याने भोस्ते घाटात हाहाकार माजला. पोलिसांनी तात्काळ दोन्ही बाजूची वाहतूक बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. सुमारे 4 तास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागला होत्या. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वाळवल्याने खोळंबलेले प्रवासी मार्गस्थ होऊ शकले. वळणावर पलटी झालेल्या एलपीजी गॅस वाहून नेणारा टैंकर तब्बल 48 तासांनंतर अपघातस्थळावरून हटविण्यात आला होता.
ही घटना ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतून मुंबईकडे ओली मासळी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाले. कंटेनर संरक्षक भिंतीला आदळून पलटी झाला. या अपघातात चालकांच्या केबिनच्या पूर्णतः चक्काचूर झाला, मात्र तरीही चालक या जीवघेण्या अपघातातून सहीसलामत बचावला.
भोस्ते घाटात त्या अवघड वळणावर वारंवार होणारे जीवघेणे अपघात लक्षात घेत महामार्ग बांधकाम विभागाने या ठिकाणी कायस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम विभागाकडून याबाबत कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने आणखी किती अपघात झाल्यावर बांधकाम विभागाला जाग येणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
Comments
Post a Comment