चिपळूण पेठमाप येथील महिलेच्या खूनप्रकरणी मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात

चिपळूण : शहरातील पेठमाप येथे एका महिलेच्या खूनप्रकरणी पोलिसांनी शनिवारी सहा दिवसाने मुख्य सूत्रधार असलेल्या एका तरुणाच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला मंगळवार दि. ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या सहा दिवसात अनेकांची पोलिसांनी चौकशी केली, यात एका मूकबधिराचा समावेश होता. या विरोधात जाब विचारण्यासाठी पेठमाप येथील काही नागरिक पोलीस ठाण्यावर धडकले होते.
पेठमाप मुकादम मोहल्ला येथील गणी मुकादम यांच्या घरामध्ये भाड्याने राहणाऱ्या कुलसूम अस्लम अन्सारी या महिलेचा सोमवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी घरात कोणी नसताना खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या वेळी घरात कुलसूम अन्सारींचा जळालेला मृतदेह एका बाजूला झाकून ठेवल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल श्वान पथकाच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले. या वेळी श्वानपथक ५०० मीटर अंतरावर घुटमळल्यामुळे आरोपी गावातीलच असा संशय व्यक्त होत होता.
दरम्यान, पोलिसांनी शनिवारी पेठमाप गणेशवाडी येथील आदेश आदवडे या एका तरुणाला संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संशयित आरोपीची कसून चौकशी करण्यात येत असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी हे अधिक तपास करीत आहेत. हा खून नक्की कोणत्या कारणासाठी झाला हे अद्याप समजलेले नाही. पोलीस कोठडीत असेपर्यंत कसून तपास केल्यावरच या खुनाबाबत सविस्तर धागेदोरे सापडतील, असे सचिन बारी यांनी सांगितले.
Comments
Post a Comment