पाली येथे आढळली कांडेचोराची तीन पिल्ले

रत्नागिरी : मनुष्य वस्तीजवळ वन्यप्राणी दिसून आल्यास टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधावा या वनविभागाकडून केलेल्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली-देवतळे येथे घराशेजारी रिकाम्या हौदात कांडेचोराची (काळमांजर) तिन पिल्ले असल्याची माहिती सजग प्राणीप्रेमी नागरिकाने वनविभागाला कळवले. त्या तिन्ही पिल्लांना वन विभागाकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
रत्नागिरी वन परिक्षेत्रातील परिमंडळातील देवतळे गावामध्ये जीवन जयवंत विंचू (रा. पाली) यांच्या घराशेजारील रिकाम्या पाण्याच्या हौदात शुक्रवारी (ता. ११) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास कांडेचोराची (काळमांजर) Asian civet या प्रजातीची सहा महिन्यांची तिन पिल्ले आढळून आली. ही माहीत नागरिकांनी वन विभागाला कळविली. त्यानंतर वरीष्ठ वन अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, न्हानू गावडे, प्र. स. साबणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिन्ही पिल्ले लहान असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होता. गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांमुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात सापडत आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी वन विभागाकडून आवाहन करण्यात आले होते. वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आल्यास किंवा संकटात सापडल्यास टोल फ्री क्रमांकावर वन विभागाशी संपर्क साधावा. याला लोकांकडून स्वतःहून प्रतिसाद मिळत आहे. देवतळे येथूनही अशाच प्रकारे संपर्क झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. या संपर्कामुळेच कांडेचारोची तिन्ही पिल्ले सुरक्षित राहीली आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कारवांचीवाडी येथे अशाचप्रकारे एक घोरपड रस्त्याच्या डांबरामध्ये अडकून पडल्याची माहिती वन विभागापर्यंत पोचली. त्यांनी घटनास्थळी जाऊन त्या घोरपडीला संरक्षण दिले.
Comments
Post a Comment