किरीट सोमय्या आज रत्नागिरी दौऱ्यावर

 

रत्नागिरी : भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या शुक्रवारी (दि.११) रत्नागिरीत येत असून, या भेटीत ते जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार आहेत. साई रिसॉर्ट कारवाई प्रकरणातील सद्यस्थिती ते जाणून घेणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी रत्नागिरीत ते कोणती भूमिका जाहीर करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरीचे माजी पालकमंत्री अॅड. अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्याचा आदेश केंद्रीय पर्यावरण विभागाने दिला आहे. माजी खा. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले होते. यावरून दापोलीमध्ये मोठा गदारोळही झाला होता. केंद्रीय पर्यावरण विभागाने हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. अॅड. परब यांच्या कालावधीत तक्रारी झाल्यानंतरही साई रिसॉर्टच्या कारवाईकडे राजकीय दबावामुळे प्रशासनाकडून चालढकल केली जात होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर साई रिसॉर्ट प्रकरणाला अधिक गती प्राप्त झाली होती. माजी खा. किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

Comments