मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला अखेर पुन्हा सुरुवात

 

रत्नागिरी : मिया बंधाऱ्याच्या कामाला अखेर पुन्हा मुहूर्त मिळाला आहे. मागील दहा महिन्यांपासून मिऱ्या बंधाऱ्याचे काम रखडले होते. पत्तन विभागाच्या सततच्या पाठपुरव्यानंतर काम पुन्हा सुरू झाले असून येणाऱ्या काही महिन्यात बंधाऱ्याचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांच्या मागणीनंतर मिऱ्या बंधाऱ्याचे काम मार्गी लागले. डिसेंबर २०११ रोजी मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे भूमीपुजन झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम झाले नाही, ठेकेदाराने केवळ दगड आणून किनाऱ्यावर टाकले होते. १० महिन्यामध्ये मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. मिया धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरु होण्याकरीता पत्तन विभाग सातत्याने पाठपुरावा करत होता. त्यानंतर पत्तन विभागाने ठेकेदार कंपनीत डी. व्ही. पी. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीला १८ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

दंडात्मक कारवाई करुनही ठेकेदाराने काम सुरु केले नाही. त्यामुळे पुन्हा १८ लाखांचा दंड ठेकेदार कंपनीला ठोठावण्यात आला. एकूण ३६ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर ठेकेदाराला जाग आली. नोव्हेंबर महिन्यापासून ठेकेदाराने मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे अत्यावश्यक आहे. दरवर्षी पावसामुळे समुद्राचे पाणी मिऱ्या परिसरातील घरांमध्ये शिरते. त्यामुळे मिऱ्या परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होणे गरजेचे आहे. सुमारे १६० कोटी रुपयांचा निधी मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी मंजूर झाला आहे.

Comments