उद्योजक मुकेश गुंदेचा यांचा शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार

रत्नागिरी : रत्नागिरी मधील प्रसिद्ध उद्योजक व सामजिक कार्यात अग्रेसर असणारे मुकेश गुंदेजा (जैन) याच्या समाजातील कार्याची दखल घेऊन त्याचा सत्कार मंत्री दीपक केसरकर याच्या हस्ते करण्यात आला. महासंस्कृती व्हेंचर्सच्यावतीने 'कोकण सन्मान २०२२' कार्यक्रमात मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते कोकणातील संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला.
मुकेश गुंदेचा यांनी 2011 पासून मुक्या जनावरांची बचाव चळवळ सुरू केली. यासाठी त्यांनी नरबे येथे गोशाळा उभारली. आतापर्यंत अपघातामध्ये जखमी 200 पेक्षा अधिक जनावरांवर उपचार करून जीवदान दिले आहे. नगरपालिका तसेच जिल्हा प्रशासन यांनी पकडलेल्या मोकाट गुरांसाठी गोशाळा उभारून त्यांच्यावर उपचार केले. नरबे येथील गोशाळेत शेकडो जनावरांना आश्रय दिला आहे. रत्नागिरी येथे कुष्ठ रुग्णांना राहण्यासाठी वसाहतीचे काम 2019 साली सुरु करण्यात त्यांचा मोठा हातभार होता. कोरोना काळात कोरोना रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी त्यांनी मोठी मदत यंत्रणा उभी केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा ना. केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महासंस्कृती व्हेंचर्सच्या संस्थापक संचालक शिल्पा परांडेकर, संचालक ऋतुराज हेसी आदी यावेळी उपस्थित होते. श्री. केसरकर यांच्या हस्ते यावेळी कोकणातील संस्कृती दर्शविणाऱ्या 'द अनएक्सप्लोरड् लेगसी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ना. केसरकर म्हणाले, कोकणचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे.. जंगल, किल्ले, समुद्र किनारे असा विविधांगी सर्वोत्तम निसर्ग कोकणात आहे..
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्याचे महत्व लक्षात घेऊन समुद्री किल्ले उभारले. जेवढे बॅक वॉटर केरळमध्ये आहे तेवढे कोकणातही आहे. कोकणवासियांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून नवीन गोष्टी स्वीकारायची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. ज्या भूमीने जन्म दिला ते मातृऋण कधीतरी फेडावे लागते. महासंस्कृती व्हेंचर ते काम करीत असल्याबद्दल कोतुक करून कोकणचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment