भाट्ये समुद्रकिनारी जिल्हा प्रशासनामार्फत स्वच्छता अभियान

 

रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भाट्ये (ता. रत्नागिरी) सागरी किनाऱ्यावर जिल्हा प्रशासनातर्फे फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने सागरी किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पालकमंत्री उदय सामंत यांनी अभियानाचा प्रारंभ केला. यावेळी उपस्थितांकडून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

पालकमंत्री म्हणाले की, स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सागरी किनारे स्वच्छ राहिल्याने येथे पर्यटक मोठ्या संख्येने वाढतील आणि त्यामुळे रोजगारही वाढतील. प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. स्वच्छता मोहीम एका दिवसापूर्वी मर्यादित न राहता त्यामध्ये सातत्य राखणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह म्हणाले की, आपल्या भागातील स्वच्छता राखणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छतेबरोबरच चांगल्या आरोग्याची जाणीव होण्याच्या दृष्टीने धावण्याच्या स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, सरपंच प्रीती भाटकर, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, फिनोलेक्स कंपनीचे कर्मचारी, सामाजिक संस्था आदींनी या स्वच्छता अभियानामध्ये उत्साहाने भाग घेतला.

Comments