कळझोंडीत बिबट्याचा पाड्यावर हल्ला

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौध्दवाडी येथे शनिवार दि. १२ रोजी रात्री बिबट्याने एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून लहानग्या तीन महिन्यांच्या पाड्यावरती जोराचा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पाडा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावरती वाटद खंडाळा येथील शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी सुनिल अलकुंटे व कळझोंडीतील रविंद्र वीर उपचार करत आहेत.
वरवडे धरण भागामध्ये गेले एक-दोन वर्षापासून बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे अनेकांनी पाहिले. गतवर्षी वरवडे परिसरातील दोन तीन जनावरे परिसरात असलेल्या बिबट्याने फस्त केली होती. या परिसरातील शेतकरी भयभीत झाले होते. वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत शेतकरी वर्गाला मानसिक आधार दिला होता. यावर्षी पुन्हा या बिबट्याने डोके वर काढले आहे. कळझोंडी बौध्दवाडी येथील वयोवृद्ध शेतकरी रामचंद्र धर्मा पवार (वय ८३) यांच्या मालकीच्या तीन महिन्यांच्या छोट्या पाड्यावरती बिबट्याने रात्री नरडीचा घोट घेत असतानाच गोठ्यातील इतर जनावरे जोरात ओरडली. गाईने हंबरडा फोडल्याने घरातील माणसांनी तात्काळ लाईट लावला. लाईटचा प्रकाश व माणसांच्या हालचाली आणि घरातील सुहास पवार यांनी रात्री झटापटीच्या दरम्याने मोठ्या धाडसाने बिबट्याच्या दिशेने दगडफेक केली. रात्री गोठ्यानजीक जाण्याचे धाडस सुहास पवार यांनी केल्याने बिबट्याला तेथून पळ काढावा लागला. याचवेळी बिबट्यानचे दात पाड्याच्या नरडीत घुसल्याने पाडा गंभीर स्थितीत आहे.
बिबट्याच्या हल्लाने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती वन विभागाला पत्रकार किशोर पवार यांनी रविवारी दिली. वनविभागाचे अधिकारी श्री. गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पाहणी केली. रात्रीच्यावेळी बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्यामुळे वाडीसह गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी अशा बिबट्यांचा वनविभागाने व प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment