चिपळूण येथील महिलेच्या निघृण हत्येमागे कोण? पोलिसांचा कसून तपास सुरू..

चिपळूण : शहरातील पेठमाप मुकादम मोहल्ला येथे राहणाऱ्या महिलेचा निघृण खून झाल्याचे उघड होताच चिपळुणात खळबळ उडाली. आता या प्रकरणी पोलिसांची चक्रे फिरत असून या महिलेचा मारेकरी कोण? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी पाच पथके तपासासाठी कामी लावली आहेत.
सोमवारी दिवसभरात या महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून, चेहऱ्यावर वार करून महिलेला पेटविले व तिचा खून करून झाकून ठेवले. हा प्रकार उघड होताच पेठमाप मुकादम मोहल्ला परिसरात एकच खळबळ उडाली. सायंकाळी उशिरा चिपळण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराबाबत पेठमाप परिसरात राहाणाऱ्या लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. संबंधित मृत महिला कुलसूम अन्सारी या मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवित होत्या. त्यांच्या पतीने त्यांना आठ वर्षांपूर्वीच सोडले आहे, अशी माहिती पुढे येत आहे. तर एक मुलगा व मुलगी शिक्षण घेत असून मुलगी रत्नागिरीमध्ये परिचारिका तर मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी रत्नागिरीत गेला असता अज्ञाताने घरात एकटी महिला असल्याचा फायदा घेत ही निघृण हत्या केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून वेगवेगळ्या शक्यता पडताळल्या जात आहेत. या प्रकरणी आठजणांचे जाबजबाब घेण्यात आले असून अजूनही चौकशी करून जाबजबाब नोंदविण्यात येत आहेत. शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. कोणता ज्वलनशील पदार्थ टाकला हे शवविच्छेदन अहवालानंतरच उलगडणार आहे.
Comments
Post a Comment