रत्नागिरीतील प्राचीन विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सव

 

रत्नागिरी : येथील प्राचीन विठ्ठल मंदिरात मध्यरात्रीनंतर संकेत मयेकर आणि सौ. सान्वी मयेकर यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पंचसूक्त पवमानयुक्त महापूजा केली. त्यानंतर उत्सवाला प्रारंभ झाला. कोरोनानंतर मोठ्या स्वरूपात होणाऱ्या या कार्तिकी एकादशीला भाविकांचा उत्साह प्रचंड होता.

 

विठुरायाच्या एकादशीला उत्सव शुक्रवारपासून सुरू झाला. पूजेनंतर आरती करण्यात आली. नंतर ६ वाजता काकडा आरती झाली. सकाळी ७ वाजल्यापासून दिवसभर विविध भजन मंडळे भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आले. एकादशीला सकाळी ११ च्या दरम्यान (कै.) दाजिबा नाचणकर यांनी सुरू केलेली पायी दिंडी भार्गवराम मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. यामध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेमध्ये टाळ-मृदंगांच्या गजरात, विठुरायाचा गजर करत आणि भजने म्हणत दिंडी हळुहळू विठ्ठल मंदिरात पोहोचली.

उत्सवानिमित्ताने भरलेल्या यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ही यात्रा १० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

Comments