सौदीचे राजकुमार भारत दौऱ्यावर, स्वागताचे बॅनर रत्नागिरीत लागल्याने चर्चांना उधाण; रिफायनरीचा मार्ग मोकळा ?

रत्नागिरी : सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा मंगळवारचा भारत दौरा रद्द झाला असून, इंडोनेशियातील जी-२० परिषद संपल्यावर ते येत्या काही दिवसांत भारतात दिल्ली येथे येणार आहेत. अनेक औद्योगिक करार यानिमित्ताने होण्याची शक्यता आहे.
सौदी अरेबियातील अरामको ही सरकारची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून तब्बल तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामध्ये अरामको कंपनीचे ४९ टक्के शेअर्स असणार आहेत. तर भारतातील हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम यांचा५१ टक्के प्रकल्पात शेअर्स असणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सोलगाव-बारसू रिफायनरीचा मार्गही यानिमित्ताने मोकळा होणार आहे. त्यामुळे सौदी प्रिन्सच्या आगमनानिमित्ताने रत्नागिरीसह सिंधुदुर्गपर्यंत ग्रीन रिफायनरी समर्थक समिती व भाजपच्या वतीने स्वागताचे बॅनर लागले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून बारसूसोलगाव परिसरात रिफायनरी व्हावी, यासाठी रिफायनरी समर्थक कामाला लागले आहेत. काहीजण याला विरोधही करीत असले, तरी समर्थकांची संख्या वाढत आहे. ज्या भागात ही रिफायनरी होऊ घातली आहे त्या गावातील ग्रामस्थांनी आपल्या जागांचे सात-बारा उतारेच संमतीसह प्रशासनाकडे यापूर्वी दिलेले आहेत. काहीजण अद्याप विरोधात असले, तरी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासासाठी ही रिफायनरी महत्त्वाची ठरणार आहे.
माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही सत्ता बदलानंतर रिफायनरीसाठी अनुकूल भूमिका घेताना, लोकजागृती व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नाणारला झालेल्या विरोधामुळे हा प्रकल्प राजापूरमधून अन्यत्र हलवण्यात येतोय की काय, अशी चर्चा होती. अगदी चंद्रपूर आणि गुजरातचे नावही आघाडीवर होते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही रिफायनरी बारसू-सोलगावला व्हावी, यासाठी रिफायनरी समर्थक कामाला लागले होते. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे दिल्ली येथे भारत भेटीला येत असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी शिष्टाई करतील, असा आशावाद आहे. 'अरामको 'चा ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापुरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.. सौदीच्या राजपुत्राच्या दोऱ्यामुळे रिफायनरी समर्थक समितीने व माजी खा. नीलेश राणे यांनी स्वागताचे आणि पंतप्रधान मोदी यांच्या आभाराचे बॅनर रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्ये लावण्यात आले आहेत. हे बॅनर सध्या रत्नागिरीत चर्चेचा विषय ठरले आहेत.
Comments
Post a Comment