परशुराम घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद होणार

चिपळूण : पावसाळा सुरु होण्यापूर्वी परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी बांधकाम विभाग प्रयत्नशील असून यासाठी दोन महिने परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
येत्या काही दिवसात बांधकाम विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतील आणि घाट बंद केल्यावर वाहतुकीची पर्यायी व्यवस्था काय करता येईल यावर निर्णय घेतील अशी माहिती महामार्ग बांधकाम पनवेल विभागाचे अभियंता श्रीकांत बांगर यांनी माहिती दिली.
मुंबई गोवा महामार्गावरीत परशुराम घाट हा अतिशय धोकादायक घाट मानला जातो. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी शिवाय उरात धडकी भरवणारी नागमोडी वळणे अशी या घाटाची रचना आहे. या घाटात आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे तर कित्येकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. वाहतुकीच्या दुष्टन अतिशय धोकादायक असलेल्या या घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र घाटातून सुरु असलेल्या रहदारीमुळे चौपदरीकरणाचे काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात या घाटाच्या चौपदरीकरणाला सुरवात करण्यात आली होती. मात्र काम सुरु झाल्यापासून अडथळ्यांची शर्यत सुरु असल्याने निर्धारित वेळेत काम पूर्ण करणे अशक्य होऊन बसते आहे. गतवर्षी घाटाच्या चौपदरीकाराचे काम सुरु होताच दरड कोसळण्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत एक पोकलेन मशीन आणि एक जेसीबी एका मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता. एका कामगाराचाही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक अडथळे येतच राहिले.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी घाटाचे काम पूर्ण व्हावे यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि महामार्ग बांधकाम विभाग यांनी एकत्र बसून परशुराम घाट वाहतुकीसाहत बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला त्यानुसार सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत घाट वाहतुकीसाठी बंद ठेवून या दरम्यान महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र पावसाळा सुरु झाला तेव्हा घाटाच्या चौपदरीकरणाचे 30 टक्के काम देखील पूर्ण होऊ शकले नव्हते. पावसाळा सुरु झाला आणि परशुराम घाटात पुन्हा वारंवार दरड कोसळण्याचे सत्र सुरु राहिले त्यामुळे आधीच धोकादायक असलेला हा घाट वाहतुकीसाठी अधिकच धोकादायक झाला. दरड कोसळण्याच्या घटनेमुळे घाटातील वाहतूक पुन्हा बंद करून ती चिरणी -आंबडस -कळंबस्ते मार्गे वळविण्यात आली. सुमारे दीड महिना परशुराम घाटातील वाहतूक बंद राहिल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साधारण 11 किलोमीटर हेलपाटा मारून प्रवास करावा लागत होता.
परशुराम घाटातील रखडलेले चौपदरीकरणाचे काम या वर्षी तरी पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावे असा निर्धार महामार्ग बांधकाम विभागाने केला असून यासाठी हा घाट पुढील दोन महिने वाहतुकीसाठी दिवसरात्र बंद ठेवण्यात येणार आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याशी लवकरच या संदर्भात बैठक होणार असून या बैठकीत कधीपासून घाट बंद केला जाणार आणि या दरम्यान वाहतुकीचे नियोजन काय असणार याबाबत विचारविनिमय केला जाणार आहे. ज्या काळात घाट बंद राहील त्या काळात हलकी वाहने चिरणी -आंबडस कळंबस्ते मार्गे वळविण्यात येणार आहेत. तर महामार्गावरील अवजड वाहतूक कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाटमार्गे वळविण्यात येणार असल्याचे बांगर यांनी बोलताना सांगितले.
Comments
Post a Comment