तुम्ही जे कराल ते इतके उच्च दर्जाचे करा की तुम्ही अत्युच्च ठिकाणी पोहोचाल : डॉ. अलिमियाँ परकार

रत्नागिरी : तुम्ही जीवनात कोणते क्षेत्र निवडताय, हे महत्त्वाचे नाहीये. तुम्ही जे कराल ते इतके उच्च दर्जाचे करा की तुम्ही अत्युच्च ठिकाणी पोहोचाल. हा विचार मला माझ्या लहानपणी पटवर्धन हायस्कूलमध्ये गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांनी दिला. मी हे ध्यानात ठेवले आणि मराठी माध्यमात शिकूनही इंग्रजी शिकलो, बोलू लागलो. समाजाने हा विचार अंगिकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन डॉ. अलिमियाँ परकार यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे राष्ट्रनिर्माता पुरस्कार सन्मान (नेशन बिल्डर अॅवॉर्ड) सोहळ्यात ते बोलत होते. भारत शिक्षण मंडळाच्या आगाशे विद्यामंदिरच्या नाटेकर सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र घाग, सचिव रूपेश पेडणेकर आणि रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर नीलेश मुळ्ये, नमिता कीर आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरीची प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. श्री. घाग यांनी मनोगतामध्ये क्बलची माहिती दिली आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात कॅप्टन दिलीप भाटकर (वांद्रे-वरळी सी लिंकसाठी आयआयटी पवईमार्फत नियुक्त समितीत सदस्य), प्राजक्ता कदम (ज्ञानज्योती अॅवॉर्ड), सो. माधुरी कळंबटे (स्टार्ट अप राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त) यांनाही गौरवण्यात आले. प्रास्ताविकामध्ये विनायक हातखंबकर यांनी रोटरी क्लबने (आंतरराष्ट्रीय) केलेल्या भरीव कार्याची माहिती दिली. रत्नागिरीमध्येही ई लर्निंग सुविधा, स्वच्छतागृह, बेंचिस, बसशेड, रक्तदान शिबिरे, पोलिओ निर्मूलन आदी उपक्रमांची माहिती सांगितले. समाजाचे देणं लागतो या हेतूने रोटरी काम करत असून यात रत्नागिरीकरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. हातखंबकर यांनी केले.
Comments
Post a Comment