आमची मुस्कटदाबी करण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न : आमदार भास्कर

सिंधुदुर्ग : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते आमदार भास्कर जाधव सोमवारी सकाळी ११ वाजता कुडाळमध्ये दाखल झाले.
गेल्या महिन्यात १८ ऑक्टोबरला कुडाळमध्ये आयोजित रॅलीत आमदार भास्कर जाधव यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी न्यायालयाकडून आ. जाधव यांना कुडाळ पोलीस स्थानकात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी सकाळी कुडाळ पोलीस स्टेशन येथे हजेरी लावली. दरम्यान शिंदे फडणवीस सरकारकडून आपली मुस्कटदाबी होत असल्याची टीका आ. जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव सोमवारी सकाळी ११ वाजता कुडाळ येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे कुडाळ शिवसेना शाखेतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, अतुल बंगे, संजय भोगटे, बबन बोभाटे तसेच तमाम शिवसैनिक, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी कुडाळ पोलीस स्टेशन येथे जाऊन हजेरी लावली.
उद्धव ठाकरे गटाचे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत्तीसंदर्भात विवरण आणि तपासाला सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली होती. या विरोधात महाविकास आघाडीने १८ ऑक्टोबर रोजी कुडाळमध्ये काढलेल्या मोर्चाच्या सभेत गुहागरचे आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल जनमानसात बदनामी अब्रूनुकसानीकारक तसेच प्रक्षोभक, चिथावणी देणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कुडाळ पोलिसांनी अटकेसंदर्भातील भास्कर जाधव यांना नोटीस बजावली होती.
दरम्यान, प्रकरणात भास्कर जाधव यांच्यावतीने विजयसिंह ठोंबरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करीत युक्तीवाद केला होता. त्यानुसार, जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी अटी व शर्तीवर आमदार भास्कर जाधव यांना हंगामी अटकपूर्व अर्ज मंजूर केला होता. परंतु, आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ पोलीस स्टेशन येथे हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सकाळी ११.३० वाजता न्यायालयाचा सन्मान राखण्यासाठी आपण कुडाळ पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.
सध्या आमच्या नेत्यांच्या सभांना बंदी घालण्यात आली आहे. आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून हा शिंदे फडणवीस सरकारकडून दडपशाहीचा कारभार होत आहे. आमची मुस्कटदाबी करून नामोहरम केले जात आहे, अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली. परंतु, याचा आम्हाला राजकीय फायदा होईल, असा विश्वास आ. जाधव यांनी व्यक्त केला. राज्यातील जनता डोळस असून याचा जाब विद्यमान सरकारला द्यावाच लागेल, अशी प्रतिकिया जाधव यांनी दिली.
मुंबईतील अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीत झालेला विजय हे आमच्या प्रतिस्पध्र्थ्यांना उत्तर असून त्यांनी ऋतुजा लटके यांचे विशेष अभिनंदनही केले. या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सीपीआय, आरपीआय काही गट, मुस्लिम समाज, परप्रांतीय लोकांनी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद, असे भास्कर जाधव म्हणाले. एकंदरीत महाराष्ट्रातील जनता आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबिरपणे उभी असून ही एक सुरुवात असल्याचे ते म्हणाले.
Comments
Post a Comment