दामले विद्यालयात दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उदघाटन

 रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या दामले विद्यालयात कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर निधीतून शाळा दुरुस्ती व अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या कामाचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी औषधी वनस्पती लागवडीच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी श्री. सामंत म्हणाले, कोविडच्या परिस्थितीमुळे दामले विद्यालयाचा शतकपूर्ती समारंभ करता आला नाही. तो आता दिमाखदार स्वरूपात करू. दामले विद्यालयाला १०० वर्षे पूर्ण झाली, हा ठेवा रत्नागिरी पालिकेने जपला पाहिजे. जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घसरत आहे; मात्र गेल्या दोन वर्षांत दामले विद्यालयाची पटसंख्या दुपटीने वाढली आहे. ही आदर्शवत बाब आहे. या विद्यालयाचे पावित्र्य टिकवणे ही शिक्षकांव्यतिरिक्त पालक तसेच सर्वांचीच जबाबदारी आहे. कोटक बँकेने सीएसआर निधीतून जो मदतीचा हातभार लावला, तसाच यापुढेही लावावा, अशी विनंतीही सामंत यांनी केली.

यावेळी पालिकेचे माजी गटनेते राजन शेट्ये, निमेश नायर, बाबू म्हाप, तुषार बाबर, कोटक महिन्द्रा बँकेचे व्हाइस चेअरमन परीक्षित मसराम, मुख्याध्यापक प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक रवींद्र शिंदे यांनी केले, तर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी आभार मानले.

Comments