मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत; 'एनएचएआय'चा दावा, याप्रकरणी उद्या सुनावणी

 Sachin tendulkar Comment on T20 World Cup India vs England Match

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया टीकेची धनी बनली आहे. अनेक माजी क्रिकेटर्स टीम इंडियाला खराब कामगिरीमुळे दुषणं देत असताना क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरने मात्र भारतीय संघाची बाजू घेतली आहे.

मुंबई : सलामी जोडीचं अपयश, पॉवरप्लेमधील षटकांमध्ये भारतीय खेळाडूंची अतिशय संथ सुरुवात, गोलंदाजांची सुमार कामगिरी अशा अनेक कारणांनी इंग्लंडविरोधातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हा पराभव इतका लाजीरवाणा होता की भारताला आबही राखता आली नाही. इंग्लंडने १० विकेट्सने पाणी पाजून भारताला विचार करायला भाग पाडलं. त्यामुळे मोठ्या स्पर्धेत कच खाण्याचा इतिहास भारताने अबाधित ठेवला, असं म्हणावं लागेल. या पराभवानंतर टीम इंडिया टीकेची धनी बनली आहे. अनेक माजी क्रिकेटर्स टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे दुषणं देत असताना 'क्रिकेटचा देव' अर्थात सचिन तेंडुलकरने मात्र भारतीय संघाची बाजू घेतली आहे.
"मला माहित आहे की इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील भारताचा झालेला पराभव खूपच निराशाजनक होता. देशवासीयांच्या भावनांचा मी सन्मान करतो. पण आपण सगळे भारतीय क्रिकेट रसिक भारतीय क्रिकेटचे हितचिंतक आहोत. चांगल्या वाईट परिस्थितीत आपण भारतीय संघाच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभे असतो. भारताने कित्येक अविस्मरणीय विजय मिळवले आहेत. त्यामुळे मागील पराभवाच्या आधारे तुम्ही भारतीय संघाचं मोजमाप करु नका.आपण जगातील नंबर वन टी-२० संघ देखील राहिलेलो आहोत. जगातील क्रमांक एकचा संघ एका रात्रीत होत नाही, त्यासाठी दीर्घकाळ चांगले क्रिकेट खेळावे लागते, जे आपल्या भारतीय संघाने खेळले आहे, ती उंची गाठली आहे. त्यामुळे एका पराभवामुळे भारतीय संघ वाईट ठरत नाही", असं म्हणत सचिनने क्रीडा रसिकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
"अॅडलेडच्या मैदानावर १६८ ही चांगली धावसंख्या नव्हती, मी ही मानत नाही. कारण मैदानाच्या सीमारेषा खूपच लहान आहेत. त्यामुळे भारतीय संघाने कमीत कमी १९० धावा तरी करायला हव्या होत्या. त्यात गोलंदाजांनी सुमार कामगिरी केली. आपले गोलंदाज एकही विकेट घेऊ शकले नाहीत. पण शेवटी पराभव आणि विजय हा खेळाचा एक भाग आहे. भारतीय संघाची कामगिरी उत्तम आहे, असं मी म्हणत नाहीये. पण कोणताच खेळाडू खराब खेळायचं म्हणून मैदानावर उतरत नाही. जिंकण्याच्या इराद्यानेच तो मैदानावर उतरतो. खेळात चढ-उतार असतात. आपण सदा सर्वदा प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करु शकत नाही. कधी वेळ समोरील संघाचीही असते", असं म्हणत सचिनने टीकाकारांना उत्तर देताना भारतीय संघाची पाठराखण केली.
 
टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय संघ उघड पडला!

ऑस्ट्रेलियन भूमीत खेळताना भारतीय संघाला अडचण येणार, अशी सुरुवातीपासूनच चर्चा होती. कारण उसळत्या खेळपट्टीवर खेळताना भारतीय फलंदाजांची धांदल उडणार, हे सगळ्यांच्याच मनी होतं. विश्वचषकात अगदीच तसं चित्र दिसलं नाही, पण कधी फलंदाजांनी माती खाल्ली तर कधी गोलंदाजांनी कच खाल्ली. पाकिस्तान, बांगलादेशने तर अगदी शेवटच्या बॉलपर्यंत भारतीय संघाला झुंजवलं. उपांत्य फेरीत भारत इंग्लंडला मात देईल आणि पाकिस्तानशी दोन हात करुन वर्ल्डकप जिंकेल, अशी आशा भारतीयांना होती. मात्र इंग्लंडविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवाने भारतीय संघाचं नाक कापलं

Comments