महावितरणच्या रत्नागिरी परिमंडलात ३२ विद्युत सहाय्यकांची नियुक्ती

रत्नागिरी : विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महावितरणने गेल्या आठ दिवसांत राज्यभरातील १ हजार १३ विद्युत सहाय्यकांना राज्यात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात नियुक्ती पत्रे दिली. त्यामध्ये रत्नागिरी परिमंडलातील ३२ जणांचा समावेश आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात झालेल्या महासंकल्प कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महावितरणच्या १० विद्युत सहाय्यकांना नियुक्ती पत्रे देऊन या संकल्पाचा प्रारंभ झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ७५ हजार रोजगार देण्याचा संकल्प राज्य शासनातर्फे करण्यात आला आहे. महावितरणमधील भरती हा त्याचाच एक भाग आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित महासंकल्प कार्यक्रमात सर्व विद्युत सहाय्यकांना नियुक्ती पत्रे आज देण्यात आली. कागदपत्रांची पूर्णत: पडताळणी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये रत्नागिरी परिमंडलातील ३२ उमेदवारांना विद्युत सहाय्यक पदाची नियुक्तीपत्रे देण्यात आली. महावितरणच्या विभागीय स्तरावर या विद्युत सहाय्यकांची पदस्थापना करण्यात आली असून त्यांना तांत्रिक कामाचे प्रशिक्षणही देण्यात येईल.
महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांच्यासह मानव संसाधन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी मागील आठ दिवस अविश्रांत प्रयत्न करीत जास्तीत जास्त विद्युत सहाय्यकांना नियुक्ती पत्रे देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. महावितरणने मुख्यालयापासून परिमंडल स्तरापर्यंत विद्युत सहाय्यक पदाच्या उमेदवारांसोबत प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी यावे, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद दिलेल्या उमेदवारांना अर्जांच्या छाननीनंतर नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
Comments
Post a Comment