खेड: सन्मित्र नगर येथे झोपडीत आढळला महिलेचा मृतदेह; घातपाताचा संशय

खेड : शहरातील सन्मित्र नगर येथील मजुरांच्या झोपडीत एक महिला मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना घातपाताचा संशय असल्याने पोलिसांनी महिलेच्या पतीला चौकशीसाठी तब्यत घेतले आहे.
गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात महिलेच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खेड शहरातील डाक बंगला परिसरात असलेल्या सन्मित्र नगर येथे मोलमजुरी करणारी काही कुटुंब झोपड्या बांधून वास्तव्य करतात. त्या ठिकाणी गुरुवारी दि. 3 रोजी सकाळी एका झोपडीत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मजुरांच्या मुकादमाला मिळाली बाब गंभीर असल्याने त्याने याबाबत तात्काळ खेड पोलिसांना कळवले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. तेव्हा तो मृतदेह मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या बेबि कादरबादशा नदाफ (वय 45) हिचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान बुधवारी रात्री मृत महिलेचे तिच्या नवन्याशी कडाक्याचे भांडण झाल्याने पुढे आले. यावरून महिलांचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार असावा असा पोलिसांना संशय असून पोलिसांनी महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
खेडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच त्यांनी खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गड्ढे यांना आवश्यक त्या सूचना केल्या. पोलिसांनी मध्यधुंद अवस्थेत असलेला महिलेचा पती कादरबादशा नदाफ (वय 50) याला ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार नदाफ दांपत्याचे रात्री भांडण झाले होते, असे समजते. त्यामुळे महिलेच्या मृत्यू बाबत घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment