देवरूखच्या सदानंद भागवत यांना महासंस्कृती सन्मान कोकण पुरस्कार

 रत्नागिरी : देवरूख येथील सदानंद भागवत यांना महासंस्कृती व्हेंचरचा महासंस्कृती सन्मान कोकण पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुण्यातील महासंस्कृती व्हेंचरतर्फे दिल्या जाणार्या महासंस्कृती सन्मान कोकण पुरस्कारासाठी देवरूख येथील सामाजिक बांधिलकी जपणारे निःस्वार्थी कार्य करणारे सदानंद भागवत यांची निवड करण्यात आली आहे. कोकणातील वारसा जतन करणे, नव्या पिढीला इतिहास ठाऊक व्हावा या हेतूने कार्य करणे आणि सामाजिक बांधिलकी जपत निःस्वार्थी कार्य करणार्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. परदेशातील नोकरी सोडून देवरूखसारख्या ग्रामीण भागात राहून फक्त सामाजिक बांधिलकी जपत काम करणारे सदानंद भागवत यांच्या कार्याची दखल महासंस्कृतीने घेतली आहे.

सदानंद भागवत हे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी तालुक्यात शिक्षणाची क्रांती केली आहे. देवरूखसारख्या ठिकाणी सर्व शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत. रोजगाराच्या अनेक संधी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केल्या आहेत. विविध प्रकल्पांचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी मुंबईत नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

Comments